सेंट किट्स : सूर्यकुमार यादव तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चांगलाच तळपल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत सूर्यकुमारला सूर गवसत नव्हता. पण अखेर तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावत त्याने भारताला एकहाती सामना जिंकवून दिला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. सूर्यकुमारच्या अर्धशतकामुळे भारताला या सामन्यात सात विकेट्स राखून विजय मिळता आला. या विजयासह भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. रोहितला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सूर्यकुमारने या सामन्यात ४४ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७६ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयस अय्यरने २४ धावांची खेळी साकारत त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार बाद झाल्यावर रिषभ पंत आणि दीपक हुडा यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजकडून कायले मेयर्सने ५० चेंडूंत ८ चौकार आणि चार चौकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली होती. या खेळीच्या जोरावरच वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा करता आल्या.

रोहित शर्माला गंभीर दुखापत
सामना सुरु असतानाच रोहित शर्माला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा मैदानात उतरला होता. गेल्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रोहितने यावेळी धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. रोहितने एक षटकार आणि एच चौकार लगावत ५ चेंडूंत ११ धावा केल्या. पण त्यानंतर मैदानात त्याला असह्य वाटू लागले. त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी मैदानात घाव घेतली. भारताच्या डॉक्टरांनी मैदानात रोहितची तपासणी केली. पण रोहितला यावेळी नीट उभे राहता येत नव्हते. कारण रोहितच्या कंबरेतील स्नायू दुखावल्याचे वाटत होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे रोहितला या वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळेच रोहित शर्माने यावेळी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. रोहितला नेमकं झालंय तरी काय, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.