सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काँग्रेस सत्ताकाळातल्या सतत साठ वर्षांकडे बोट दाखवता, पण आता तुमच्या सरकारला देखील आठ वर्षे पूर्ण झालीत. घरातली नवी सून पण इतक्या वर्षात तयार होते, तिलाही इतक्या वर्षात कुठली जबाबदारी टाळता येत नाही. ती कुटुंबात काही घडलं तर त्याची जबाबदारी घेते. आज दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या भाषणातल्या एका विधानाची आठवण येतीये. स्वराज्य म्हणाल्या होत्या, सर्वसामान्य लोकांना टक्केवारीची भाषा कळत नाही. सर्वसामान्य माणूस केवळ ती भाषा समजतो, ज्यात आपल्या खिशातून किती पैसे गेले आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळालं…. त्यामुळे सरकारने सुषमाजींचं विधान डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे. लोकांच्या खिशातून ज्यावेळी आपण पैसे घेतो त्यावेळी आपण त्यांना काय देतो, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा”
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “केंद्र सरकारने २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग मला आता या सरकारला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं, ते झालं की नाही? याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती सांगणार की नाही?”
सुप्रिया सुळे यांनी पुढे आपला मोर्चा जीएसटी प्रश्नाकडे वळविला. “केंद्र सरकार जीएसटीबाबतचे निर्णय राज्य प्रतिनिधींशी चर्चा करून घेते. पण देशभरातील राज्यस्तरीय सरकारांमध्ये भाजपचे बहुमत आहे, असा मुद्दा लक्षात आणून देत सरकारच्या या भूमिकेला सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शवला. बहुतांश भाजपशासित राज्य असल्याने संबंधित राज्यं केंद्र सरकारच्या धोरणाला अनुकुलता दर्शवतात”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी “दत्त-दत्त-दत्ताची गाय” ही दीर्घ मराठी कविता सादर करुन दत्त भगवान आणि गाय सोडली तर कवितेतील तूप-दही-लोणी या सगळ्यांवर केंद्राने जीएसटी लावला असल्याचं सांगत परिस्थितीचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.