महाराष्ट्रातील 5 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव:शिक्षकदिनी देशभरातील 50 शिक्षकांचा विज्ञान भवनात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मान
शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुरुवारी विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील ५० निवडक शिक्षकांचा गौरव केला. मुलांच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये या शिक्षकांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. हे सर्व गौरवमूर्ती देशातील २८ राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेश, ६ संघटनांचे आहेत. त्यापैकी ३४ पुरुष शिक्षक, १६ शिक्षिका, २ दिव्यांग आहेत. एक शिक्षक विशेष मुलांसाठी अध्यापन करतात. यात महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रो. श्रीनिवास होथा : उच्च शिक्षण पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्रा. श्रीनिवास होथा २१ वर्षांपासून रसायनशास्त्रात अध्यापनाचे कार्य करताहेत. त्यांच्या मार्गदर्शनात विकसित स्वदेशी टीएलसी-एमएस इंटरफेसद्वारे फार्मास्युटिकल्स तथा आैषधींतील रेणूच्या वजनाची खात्री करता येते. विवेक चिमण चंडालिया : व्यावसायिक शिक्षणात योगदान काेल्हापूरचे विवेक चिमण चंडालिया यांनी ५०० विद्यार्थ्यांना रंगकाम, स्प्रे पेंटिंगचे कौशल्य शिकवून रोजगार मिळवून दिला. ते कोल्हापूरच्या शासकीय आैद्योगिक प्रशिक्षण संस्थेत क्राफ्ट इन्स्ट्रक्टर आहेत. ट्रेड करिक्युलम या विषयात त्यांनी पुस्तक लेखन केलेले आहे. सागर चित्तरंजन बगाडे कोल्हापूरच्या सौ. एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्यु. काॅलेजचे शिक्षक बागडे यांनी अनेक सामाजिक समस्यांविषयी जनजागृती करण्याचे कार्य केले. अनाथ, आदिवासी, तरुण एचआयव्ही रुग्ण, मनोरुग्ण, सेक्स वर्कर यांच्या उत्थानासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे. शिल्पागौरी प्रसाद गणपुळे : अध्यापनाची प्रभावी शैली पुण्यातील रामकृष्ण मोरे आर्ट, काॅमर्स अँड सायन्स काॅलेजमध्ये ३० वर्षांपासून अध्यापन करणाऱ्या शिल्पागौरी गणपुळे यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पिस सिडनी (ऑस्ट्रेलिया) या संस्थेच्या शांतिदूत म्हणून कार्य केले आहे. मंतेय्या चिन्नी बेडके ‘स्पीकिंग वॉल’ ची दखल जिल्हा परिषद जाजवंदी येथील अपर प्रायमरी डिजिटल स्कूल येथील शिक्षक बेडके यांनी अत्यल्प खर्चात अध्ययन-अध्यापन साहित्याची निर्मिती केली. ‘स्पीकिंग वॉल’ प्रकल्पांतर्गत भिंतीवर लेखन करून शिक्षण घडवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.