वैधमापन अधिकाऱ्याकडून “त्या’ युरियाची मोजण:160 गोणीमध्ये 6 ते 7 किलो युरिया कमी
सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील चिंतामणी ॲग्रो सर्व्हिसेस या कृषी सेवा केंद्रात एनएफएल या कंपनीचा युरिया पाचोरा येथील संघवी एजन्सीमधून विक्रीसाठी आला होता. या युरियाच्या १७० पैकी १६० गोणीमध्ये सरासरी सहा ते सात किलो युरिया प्रत्येक गोणीत कमी आला असल्याचे काही जागरूक शेतकऱ्यांचे लक्षात आल्यावर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा केला. याविषयीची माहिती जिल्हा वजन माफी विभागाचे संचालक शिवहरी मुंडे यांच्या पथकाला मिळाल्यावर त्यांनी सोमवारी प्रत्यक्ष घाटनांद्रा येथील चिंतामणी ॲग्रो सर्व्हिसेसच्या गोडाऊनमध्ये येऊन १७० गोण्यांची मोजणी केली असता त्यात काही गोण्या ४५ किलोपैकी ३४, ३५, ३७ किलो, ४३ याप्रमाणे १६० गोण्यात युरिया कमी असल्याचे दिसून आले. दुकानातील काही कंपन्यांच्या गोण्यांची तपासणी केली असता त्या गोण्यांवर प्रतिकिलो किंमत आढळून आली नाही. अशा कंपन्यांच्या मालाचीही विक्री बंद आदेश वजनमापे विभागाचे संचालक मुंडे यांनी दिले आहे. या प्रकरणाविषयी वजनमापे संचालक शिवहरी मुंडे यांना पुढील काय कारवाई करणार याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कंपनी एजन्सी व कृषी केंद्र चालक या तिघांना नोटीस देऊन जे कोणी दोषी आढळतील त्यांना वजनमापे कायद्याप्रमाणे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. या कारवाईमध्ये वैधमापन विभागाचे शिवहरी मुंडे, सहायक नियंत्रक अधिकारी गणेश मिसाळ, तालुका वैधमापन अधिकारी नामदेव वाघ, सहायक नियंत्रक अधिकारी काकासाहेब बोराडे यांचा सहभाग होता.