सात दशकांच्या अभिजात स्वरांची संपन्न परंपरा:१८ ते २२ डिसेंबर दरम्यान ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यंदा महोत्सवाचे ७० वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे बुधवार दि. १८ डिसेंबर ते रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ दरम्यान महोत्सव संपन्न होणार आहे. या पत्रकार परिषदेवेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे हे देखील उपस्थित होते. श्रीनिवास जोशी म्हणाले, माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा ७० व्या वर्षात महोत्सव पदार्पण करीत असताना नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना ‘सवाई’ सारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे. महोत्सवात पहिल्यांदाच आपली कला सादर करणारे कलाकार खालीलप्रमाणे – शाश्वती चव्हाण- झुरंगे, कृष्णा बोंगाणे, नागेश आडगांवकर, अनुपमा भागवत, सहाना बॅनर्जी, रुचिरा केदार, सावनी तळवलकर, अनुजा बोरुडे- शिंदे, अदिती गराडे, रिषित देसिकन, सौरभ काडगांवकर, अदनान सामी, आरती ठाकूर कुंडलकर, अतिंद्र सरवडीकर, चेतना पाठक, अश्विनी मोडक