73 कोटी उचलणाऱ्यांवर एवढे प्रेम करू नये:सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला, धनंजय मुंडेंनी उचललेल्या बोगस बिलांची तक्रार करणार

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात काडीचेही काम न करता अनेक बोगस बिले उचलल्याचे धस यांनी सांगितले. या बोगस बिलांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे उद्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करणार असल्याचेही ते म्हणाले. अजितदादा रागारागात बोलतात. नंतर प्रेम करतात, पण 73 कोटी उचलणाऱ्यांवर एवढे प्रेम करू नये, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. सुरेध धस म्हणाले, धनंजय मुंडे यांनी उचललेल्या बोगस बिलांच्या कामांची माझ्याकडे यादी आहे. पीडीएफही आहे. मी यादी कुणाकडेच दिली नाही. राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहेत. उद्या देणार नाही. त्यांना माहिती होणारच आहे. अजितदादांकडे तक्रार देणार आहे. आपले शागीर्द किती चांगला कारभार करतात हे दाखवणार आहे. अजित पवार यांनी सुरेश धसांबाबत बोलताना मी छोट्या कार्यकर्त्यांबाबत बोलत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती. याबाबत सुरेश धस यांना विचारले असता, त्यांचे म्हणणे बरोबर आहेत. आम्हा छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचे काय कारण? असे धस म्हणाले. अजित पवारांचे वय माझ्यापेक्षा जास्त आहे. मी लहान माणूस आहे. ते माझा एकेरी उल्लेख करू शकतात. माझा एकेरी उल्लेख केला काय, अरे तुरे केले काय, मला काही वाटत नाही. अजितदादा रागारागात बोलतात. नंतर प्रेम करतात. पण त्यांनी 73 कोटी रुपये उचलणाऱ्यांवर एवढे प्रेम करू नये, असा टोला सुरेश धस यांनी लगावला. ते नड्डा आणि अमित शाहांसोबत बोलू शकतात. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहेत. आम्हा छोट्या कार्यकर्त्यांना दादांनी बोलण्याचं काय कारण? मीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. फक्त त्यांनी एवढी बोगस बिले कशी दिली याचं उत्तर द्या बुवा, असा सवालही सुरेश धस यांनी केला.