एक चापट मारली म्हणून खून केला:मग आमची मानसिकता कशी असेल? महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुखांचा संताप

राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर भगवानबाबाचे दर्शन घेतले होते व त्यानंतर त्यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट देखील घेतली. आज सकाळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे म्हंटले आहे. तसेच संतोष देशमुख यांनी आरोपींना आधी चापट मारली होती, त्यानंतर हे सगळे घडले, असेही शास्त्री म्हणाले. यावर धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. महंत नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100 टक्के खात्रीने सांगतो. तसेच यावेळी शास्त्री म्हणाले की संतोष देशमुख यांनी आरोपींना आधी चापट मारली त्यानंतर हे सगळे घडले आहे. त्यामुळे आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करायला हवा, असे शास्त्री म्हणाले. त्यांच्या या विधानावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. धनंजय देशमुख म्हणाले, ज्या आरोपीला संतोष देशमुख यांनी चापट मारली, त्या चापट मारलेल्या आरोपीवर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी एवढा भीषण खून केला. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी 10 चापट मारल्या असत्या तरी चालले असते, असे धनंजय देशमुख म्हणाले. पुढे ते म्हणाले, एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल असे तुम्ही म्हणता, मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज बघतोय, सगळे लोक बघत आहेत, त्याचेही उत्तर दिले पाहिजे, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे. पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता तुमची असेल तर तुम्ही समाजाचं देणं लागत नाहीत हे स्पष्ट झालंय. पण, अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुडदे पडतील, असे म्हणत त्यांनी त्यांच्या शास्त्रींच्या विधानाचा तीव्र विरोध केला आहे. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून 18 पगड जातीचे लोक संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून ही विकृती असल्याचेही धनंजय देशमुख म्हणाले.