आ. दाते यांच्या तीन तपांच्या संयमी राजकारणास पारनेरकरांकडून न्याय:आदिवासी बहुल, दुर्गम भागाला प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व
तालुक्याच्या पश्चिम-उत्तरेकडील शेवटच्या टोकाला असलेल्या कन्हेर (पोखरी) गावातून येऊन व्यवसायानिमित्त पारनेर येथे स्थिरावलेल्या आमदार काशिनाथ दाते यांच्या ४० वर्षांच्या संयमी राजकीय, सामाजिक कारकिर्दीला न्याय मिळाल्याची भावना पारनेरकरांमध्ये व्यक्त होत आहे. दाते यांच्या रूपाने तालुक्याच्या आदिवासी बहुल, दुर्गम भागाला प्रथमच विधानसभेत प्रतिनिधित्व मिळाले. या भागातील स्वातंत्र्यापासून प्रतिक्षेत असलेल्या मुलभूत प्रश्नांना न्याय देण्याचे आव्हान आ. दाते यांच्यासमोर असणार आहे. त्याचबरोबर बदलत्या राजकीय परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील कार्यकर्त्यांना पाठबळ, न्याय देण्याची सर्वसमावेशक भूमिका आता त्यांना घ्यावी लागणार आहे. आ. दाते यांनी ऐंशीच्या दशकात तालुक्यातील पहिली टंकलेखन प्रशिक्षण संस्था पारनेर शहरात सुरू केली. तेव्हापासून पोखरीबरोबरच टाकळी ढोकेश्वर गटातील आदिवासी, ठाकर समाज, तसेच इतरही गरजू लोकांना महसूल, पोलिस प्रशासन, वीज मंडळ, पंचायत समिती पातळीवरील कामांसाठी दाते यांच्या रूपाने पारनेर शहरात हक्काचा माणूस मिळाला. तेथेच आ. दाते यांच्या समाजकारणाची बीजे रुजली. तत्कालीन आमदार बाबासाहेब ठुबे, माजी आमदार वसंतराव झावरे, तत्कालीन ज्येष्ठ नेते मार्तंड पठारे, माजी आमदार विजय औटी, शहाजीराव घनवट, सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पारनेर साखर कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे सभापती, देखरेख संघांचे अध्यक्ष, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. १९९५ ते २००४ दरम्यान त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले. या काळात त्यांना जिल्हा परिषदेत दोनदा, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकदा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, पराभवाने खचून न जाता संयमाने त्यांनी काम सुरू ठेवले. २००४ व २०१४ साली झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांना उमेदवारीसाठी अन् प्रचारादरम्यानही संघर्ष करावा लागला. लंके यांच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांची साथ मिळाल्याने विरोधक एकत्र आणण्यात ते यशस्वी झाले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, वसंतराव चेडे, मधुकर उचाळे, विश्वनाथ कोरडे, गणेश शेळके, सचिन वराळ, नगरसेवक अशोक चेडे, युवराज पठारे यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यामुळे आमदार काशीनाथ दाते यांचा विजय सुकर झाल्याचे दिसत आहे. विरोधकांविरुद्ध खमकी भूमिका घ्यावी लागणार सुपे औद्योगिक वसाहतीतील ‘उद्योगां’वर प्राबल्य असावे, यासाठी सातत्याने संघर्ष सुरू असतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचा परिघ विस्तारल्याने हा संघर्ष आता अधिक तीव्र होणार आहे. त्याची झळ उद्योजकांना बसू नये, यासाठी आ. दाते यांना खमकी भूमिका घ्यावी लागणार आहे.