वृत्तसंस्था, बीजिंगः पाकिस्तानस्थित ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशदवादी अब्दुल रेहमान मक्कीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांत चीनने खोडा घातला आहे. मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांत मांडलेल्या संयुक्त प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीचा ‘१२६७ आयएसआयएल ठराव’ आणि अल् कायदा निर्बंध समितीअंतर्गत मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने संयुक्त प्रस्ताव दाखल केला होता; पण चीनने अखेरच्या क्षणी प्रस्तावाला विरोध केला.

‘सर्व प्रकारच्या दहशतवादाचा चीन कायमच विरोध करत आला आहे; तसेच ‘१२६७ ठरावा’शी संबंधित प्रक्रिया आणि नियमांचे नेहमी पालनही करत आला आहे. यापुढेही चीन ‘यूएनएससी’मध्ये विधायक आणि जबाबदार वृत्तीने काम करीत राहील,’ चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले.

यापूर्वीसुद्धा चीनने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यास नकार दिला होता; पण २०१९ मध्ये भारताच्या प्रयत्नांमुळे लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करून भारताने मोठा राजनैतिक विजय मिळवला होता.

वाचाः मुसेवाला हत्या प्रकरणाला वेगळं वळण, चौकशीत संतोष जाधवकडून मोठा खुलासा

भारताकडून संतप्त प्रतिक्रिया

दहशतवादी मक्कीबाबत चीनने घेतलेल्या भूमिकेविषयी भारताने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘चीनचा हा निर्णय दहशतवादाविरोधात लढण्याच्या त्यांच्याच दाव्याच्या विपरित आहे. यातून फक्त चीनचा दुटप्पीपणा दिसून येतो. जागतिक दहशतवाद्याला निर्बंधांपासून वाचवणे चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे; तसेच मक्की विरुद्ध अनेक पुरावे सादर करूनही चीनने हा निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी आहे,’ अशी प्रतिक्रिया सरकारी सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे मक्की?

– अब्दुल रेहमान मक्की (वय ७४) मुंबईवर २००८मध्ये झालेल्या ‘२६/११’चा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा

– अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने २०१० मध्ये मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित

– मक्कीविषयी माहिती देणाऱ्याला २० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.