म. टा. प्रतिनिधी, नाशिकः फर्निचर कारखान्याचे संचालक शिरीष गुलाबराव सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. सोनवणे यांच्या मोबाइलमध्ये संशयितांनी एक सिमकार्ड टाकून त्याचा वापर केला. हे सिमकार्ड त्यांनी नाशिकरोड परिसरातील एका मोबाइल दुकानातून घेतले. त्यावेळी तिथल्या ‘सीसीटीव्ही’त दोन संशयित चित्रीत झाले आहेत. पोलिसांनी त्यांचे फोटो प्रसिद्ध केले असून, पथकांद्वारे त्यांचा शोध सुरू आहे. यासह संशयित कुठेही दिसल्यास नागरिकांनीही पोलिसांना कळवावे, असे सूचित करण्यात आले आहे.

९ सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कारखान्यातून सोनवणे बेपत्ता झाले. ग्राहक बनून आलेल्या तिघांसोबत एका कारमध्ये ते बसले. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी सायंकाळी मालेगावातील सायतरपाडे कालव्यात त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मालेगावात दाखल खुनाचा गुन्हा १२ सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलिसांत वर्ग झाला. या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड पोलिसांसह गुन्हे शाखेची सर्व पथके करीत आहेत. नाशिक जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील ‘सीसीटीव्हीं’द्वारे सोनवणेंच्या अपहरणावेळी वापरलेल्या कारचा माग काढण्यात आला. मात्र, पोलिसांना त्यात फार काही मिळाले नाही. दरम्यान, सोनवणे बेपत्ता झाले तेव्हा त्यांच्या मोबाइलचा वापर करून इतर सिमकार्डद्वारे काही मेसेज केल्याचे समजते. हे सिम संशयितांनी नाशिकरोडच्या एका दुकानातून घेतले. तिथल्या ‘सीसीटीव्ही’त संशयास्पद हालचाली व त्यांचे फोटो चित्रीत झाले आहेत. त्यानुसार पोलिस मोबाइल शोधून संशयितांचा माग काढत आहेत. दरम्यान, संशयितांनी नियोजनबद्धरित्या हा गुन्हा केल्याचे दिसते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा ठेवली असून, लवकरच मारेकरी ताब्यात येण्याची शक्यता आहे.

संशयितांबाबत येथे कळवा

नाशिकरोड पोलिस ठाणे : ०२५३-२४६५५३३, २४६५१३३

अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक : ९९२०४४३३११

गणेश न्हायदे, गुन्हे निरीक्षक : ८१०८०९८८७७

ई-मेल : nashikroad_police@nashikpolice.comSource link

Leave a Reply

Your email address will not be published.