‘मस्साजोग’ आरोपींवर पक्ष न पाहता कारवाई होणार:अजित पवार यांनी दिली ग्वाही; कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे केले स्पष्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील मुद्यांवर भाष्य केले आहे. याचसोबत त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहेत. अजित पवार म्हणाले, आज एसआयटीची चौकशी सुरू आहे, सीआयडीची चौकशी सुरू आहे, या सर्व चौकशी सुरू असताना त्यात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले आहे की या सगळ्यात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात मी देखील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो, तेव्हा त्यांना सांगितले की कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि जर तो दोषी आढळला तर कारवाई करा, यावर त्यांनी मी देखील याच मताचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्यात कोणावर देखील अन्याय होणार नाही याची देखील आम्हाला खबरदारी घ्यावी लागते. तसेच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अजित पवार म्हणाले, विरोधकांना उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले, नुसते आरोप करण्यापेक्षा तुम्ही पुरावे द्या, पोलिसांना द्या, एसआयटीला द्या, सीआयडीला द्या, यातून चौकशीसाठी मदत होईल. पुराव्याशिवाय आरोप करणे चुकीचे आहे. आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या. मी तुम्हाला आश्वासन देतो यात आम्ही कुठेलेही राजकारण आणणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. अमित शहा यांच्याकडे मी काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याकडे सहकार खाते आहे तसेच त्यांच्याकडे पोलिस खाते आहे. मी साखर कारखाने तसेच एमएसपी, शेतकऱ्यांचे प्रश्न व पिकांचे काही प्रश्न होते त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या भेटीला गेलो होतो. दरम्यान, पुण्यातील प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटील बनला आहे. त्यामुळे आपल्याला यावर तोडगा काढण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे मी यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पुन्हा एकदा बैठक होणार असून यात मी लोकप्रतिनिधींना देखील सामील करून घेणार आहे. तसेच पीसीएमसी कमिशनरने देखील माझा वेळ घेतला होता, त्यात पिंपरी येथे काही चांगली कामे करण्यात आली आहेत, त्यासंदर्भात देखील मी चर्चा केली आहे. याच सोबत पुण्यात गुन्हेगारी वाढत असून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.