अभिनेत्री कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर जबलपूर उच्च न्यायालयाने घातली बंदी:सेन्सॉर बोर्डाला आदेश, शीख समाजाची बाजू एेकून मगच निर्णय घ्या
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतच्या बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर जबलपूर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. शीख समुदायाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आधी एेकून घ्यावे, मगच चित्रपटाला परवानगी द्या, असे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्यावर न्यायालयाने नव्याने अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जबलपूर शीख संगत आणि श्री गुरुसिंह सभा इंदूर यांनी याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल पुष्पेंद्र यादव यांनी हंगामी मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठासमोर उत्तर दिले. त्यांनी सांगितले की चित्रपटाला फक्त ऑनलाइन प्रमाणपत्राचा क्रमांक जारी करण्यात आला आहे. इतर प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. याचिकाकर्त्याच्या अर्जावर न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी उच्च न्यायालयाने जबलपूर शीख संगत आणि श्री गुरुसिंग सभा इंदूर यांच्या जनहित याचिका निकाली काढल्या आहेत. दरम्यान, ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर तेलंगणमध्ये तेथील काँग्रेस सरकारने आधीच बंदी घातली आहे. काँग्रेससह विविध पक्षांचा आक्षेप लक्षात घेऊन सेन्साॅर बाेर्डानेही अद्याप चित्रपटाला मंजुरी दिलेली नाही.