अदानी ग्रीनने आरोप फेटाळले, शेअर्स उसळले; संसदेत गोंधळ:अदानींवर एफसीपीए उल्लंघनाचा आरोप नाही

अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एजीईएल)बुधवारी स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली की गौतम अदानी, पुतण्या सागर अदानींवर कथित लाच प्रकरणात यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्टच्या (एफसीपीए) उल्लंघनाचा आरोप नाही. एजीईएलच्या मते, त्यांच्यावर सिक्युरिटीज आणि वायर फसवणूक यासह तीन गुन्ह्यांचा आरोप आहे, ज्यात दंड आहे. यूएस न्याय विभागाने गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात एफसीपीएचे उल्लंघन करण्याच्या कटाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात गौतम व सागर अदानी किंवा विनीत जैन यांचा उल्लेख नाही. एजीईएलनुसार, या तिघांवर सिक्युरिटीज फसवणुकीचा कट, वायर फसवणूक कट आणि सिक्युरिटीज फसवणुकीचे आरोप आहेत. सर्वसाधारणपणे अशा आरोपांसाठीचे दंड लाचखोरीपेक्षा कमी गंभीर असतात. गौतम व सागर यांच्यावर सिक्युरिटीज कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि अदानी ग्रीनला या कायद्याचे उल्लंघन करण्यात मदत केल्याबद्दल दिवाणी तक्रारीचा सामना करावा लागत आहे. एजीईएलवर सौरऊर्जा विक्री कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २२०० कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी समूहाने आरोप फेटाळून लावत बचावासाठी कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचे सांगितले होते. संसद ठप्प… राज्यसभेत चर्चेसाठी विरोधकांच्या १८ नोटिसा, सभापतींनी सर्व नोटिसा केल्या रद्द सलग दुसऱ्या दिवशी संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. विरोधक अदानी समूहावर अनियमितता, संभल हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी दबाव आणत होते. लोकसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला, मात्र विरोधी सदस्य घोषणाबाजी करत वेलमध्ये आले. यामुळे कामकाज दुपारी १२ पर्यंत व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. अदानी मुद्द्यावर जेपीसीच्या मागणीसह इतर मुद्द्यांवर सभापती जगदीप धनखड यांनी नियम २६७ अंतर्गत विरोधकांच्या १८ नोटिसा रद्द केल्याने राज्यसभेत गोंधळ वाढला. यामध्ये सभापतींचा निर्णय अंतिम असल्याचे धनखड यांनी सांगितले. त्यानंतरही विरोधकांचा गदारोळ थांबत नसल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
बाजारात उसळी… अदानींच्या शेअर्समध्ये अपर सर्किट अदानी समूहाच्या स्पष्टीकरणानंतर बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स २३० अंकांनी (०.२९%) वाढून ८०,२३४.०८ वर आणि निफ्टी ८०.४० अंकांनी (०.३३%) वाढून २४,२७४.९० वर बंद झाला. अदानी ग्रुपच्या १० कंपन्यांचे समभाग ५ ते २०% वाढले. माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी अदानींच्या दाव्याचे समर्थन केले. रोहतगींच्या मते, अदानी व त्यांच्या सहकाऱ्यांवर सुरक्षा व बाँडशी संबंधित आरोप आहेत. आरोपपत्रात लाच दिलेल्या एकाही व्यक्तीचे नाव नाही. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनीही सांगितले की, एजीएनविरुद्धच्या खटल्यात कोणताही गुन्हा नाही. दोघेही अदानींच्या बचाव पथकात आहेत.
एफसीपीएअंतर्गत यूएस लिंक कंपनी किंवा व्यक्ती (यूएस लिस्टेड, गुंतवणूकदार किंवा संयुक्त उपक्रम) कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला पैसे ऑफर करणे किंवा देणे हा गुन्हा आहे. एजीईएलच्या मते, ग्रुपची कोणतीही कंपनी यूएसमध्ये व्यवसाय करत नाही. यूएस गुंतवणूकदारांची एजीईएलसारख्या काही कंपन्यांमध्ये इक्विटी किंवा डेट फंडात गुंतवणूक आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment