अदानी समूह आता सेबीच्या रडारवर; उत्तर मागवले:उल्लंघनाचीही चौकशी, भारतासोबतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही : व्हाइट हाऊस

अमेरिकन गुंतवणूकदारांच्या पैशाने भारतात २,२०० कोटींची लाच दिल्याच्या आरोपावरून फेडरल कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर भारतातील अदानी समूहाच्या अडचणी वाढू शकतात. समूहाने बाजारावर प्रभाव टाकणारी माहिती उघड करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले का, याचा सेबी तपास करत असून सेबीने समूहाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. सेबीने केनियातील विमानतळ विस्तारीकरण करार रद्द करणे व अमेरिकेतील खटल्याबाबत उत्तरे मागवली आहेत. मात्र, समूहाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने स्टॉक एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली की अदानी ग्रीन एनर्जी लि. लाचखोरीच्या आरोपांबाबत यूएस न्याय विभागाच्या तपासाचा पुरेसा खुलासा करण्यात अयशस्वी ठरली आहे काय? हा तपास दोन आठवडे चालू शकतो. त्यानंतर औपचारिक तपास सुरू ठेवायचा की नाही हे सेबी ठरवेल. हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर सेबीने अदानी समूहाची चौकशी केली होती. तथापि, सेबीने अद्याप निष्कर्ष उघड केले नाहीत. दरम्यान, व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कराइन जीन-पियरे म्हणाल्या की त्यांना अदाणींविरोधातील आरोपांची माहिती आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंधांचा विचार केला तर दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत. भविष्यातही ते असेच राहतील. दुसरीकडे, यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज (एसईसी) च्या अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक संजय वाधवा म्हणाले की, जर यूएस सिक्युरिटीज कायद्यांचे उल्लंघन होत असेल तर आम्ही कठोर कारवाई करू आणि त्यांना जबाबदार धरू. पुढे काय : भारतातील आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर परिणाम होण्याची भीती शुक्रवारी, अदानी पोर्ट््स व स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या २०२९ बाँडची किंमत २.५ डॉलरने घसरून ८७.८ डॉलरवर आली. दोन दिवसांत ते ५ डॉलरपेक्षा जास्त घसरले. तसेच दीर्घकालीन परिपक्वतेचे रोखे ५ डॉलरहून अधिक घसरले. अशा परिस्थितीत हे प्रकरण अदानीपुरते मर्यादित राहू शकत नाही. भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रावर व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर व्यापक परिणामाची शक्यता आहे. विश्लेषक निमिष माहेश्वरींच्या मते, वादामुळे भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय गुंतवणूक घटेल. गुंतवणूकदार अधिक पारदर्शकता आणि छाननीची मागणी करू शकतात, ज्यामुळे प्रकल्प वित्तपुरवठा कमी होऊ शकतो. नवी समस्या : काही बँका अदानींना नवीन कर्ज देणे बंद करण्याच्या विचारात अमेरिकेतील खटल्यामुळे अदानी समूहाला निधीची कमतरता भासू शकते. काही बँका अदानी समूहाला नवीन कर्ज देण्यावर तात्पुरती बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे क्रेडिट विश्लेषकांचे मत आहे. तथापि, समूहाची विद्यमान कर्जे कायम राहतील. रिसर्च फर्म क्रेडिटसाइट्सने चिंता व्यक्त करत म्हटले की, समूहाच्या ग्रीन एनर्जी व्यवसायासाठी पुनर्वित्त पुरवठा ही सर्वात मोठी चिंता असेल. रेटिंग एजन्सी एस अँड पीने इशारा दिला की, समूहाला इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये नियमित होण्याची गरज असेल, परंतु त्याला कमी खरेदीदार मिळू शकतात. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय बँका आणि रोखे गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक मर्यादित करू शकतात. सेन्सेक्स १,९६१ अंकांनी वधारला, अदानी समूहाचे १० पैकी ६ शेअर्स वाढले सात आठवड्यांच्या घसरणीनंतर शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात कमालीची वाढ झाली. सेन्सेक्स १९६१ अंकांच्या (२.५४%) वाढीसह ७९,११७ वर बंद झाला. तसेच दिवसभरात २,०६२ अंकांची वाढ झाली होती. निफ्टी ५५७ अंकांनी (२.३९%) वाढून २३,९०७ वर बंद झाला. ५ जूननंतर म्हणजेच साडेपाच महिन्यांतील ही सर्वात मोठी एकदिवसीय उसळी आहे. या वाढीसह बीएसई लिस्टेट कंपन्यांचे मार्केट कॅप ७.३२ लाख कोटी रुपयांनी (१.७२%) वाढून ४३२.७१ लाख कोटी रुपये झाले आहे. बिजदने म्हटले, करार केंद्राशी होता, अदानींसोबत नाही बिजू जनता दल (बिजद) ने ओडिशातील अदानी समूहासोबत वीज खरेदी कराराच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. पक्षाने म्हटले की २०२१ मधील करार दोन सरकारी संस्थांमध्ये होता. अदानी समूहाशी नाही. हा केंद्राच्या योजनेचा भाग आहे, जी ‘मॅन्युफॅक्चरिंग लिंक्ड सोलार स्कीम’ आहे. यासाठी ५०० मेगावॅट अक्षय ऊर्जा खरेदी करायची होती. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले, महाराष्ट्रात एनडीएच्या विजयाच्या आशेने बाजारातील वाढ दिसून आली. अदानी प्रकरणाने बाजाराला प्रभावित केले होते. अदानी मुद्दा मागे सोडून बाजार पुढे जाऊ पाहत असल्याचे शुक्रवारच्या तेजीचे संकेत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment