आगामी होणाऱ्या निवडणुकांत अजित पवार गटाने लोकसभेच्या जागांसाठी राज्यभर चाचपणी सुरू केली आहे. त्यात शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गटाने दावा केला असून त्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार गटाकडून होऊ लागली आहे. त्यामुळे आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सहभागी झाले. मात्र, शिंदे गटाकडून या जागेबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मात्र अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. पण ते जर अजित पवार गटात आले तर शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र या बातमी बाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आपण याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या बातमीने चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
शिरूर लोकसभेत सलग तीन वेळा खासदार
सध्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे सहकारी म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांची ओळख होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. त्यानंतर राष्ट्रवादी सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा शिरूर लोकसभेचे नेतृत्व केले. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या मतदार संघात जोरदार दौरे सुरू केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील त्याचे परिणाम पहायला मिळाले. मात्र, आढळराव पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेने शिरूरच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News