आदित्य ठाकरेंनी पुन्हा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात, एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा

आदित्य ठाकरेंनी पुन्हा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात, एकनाथ शिंदेंनी साधला निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तीनवेळा भेट घेतली आहे. आज देखील त्यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना झिडकारले, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. तुम लढो हम कपडा सांभालते है, तसे तुम लढो हम बुके देके आते है.. असे मी एकदा म्हटले होते. शिव्या शापाशिवाय ते काही बोलत नव्हते. पहिले सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरे त्यांनी काहीच केलेले नाही. आम्ही त्यांच्या आरोपांना आरोपातून उत्तर दिले नाही, तर कामातून उत्तर दिले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात वडील उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एका भेटीत विविध विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे जे गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यासंदर्भातील प्रश्नांवर देखील आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. हा एकंदरीतच एकनाथ शिंदे यांना एकटे पाडण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment