तुम्हाला मुंबई गिळायची आहे का?:आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंचा सवाल; SRAच्या कारवाईमुळे वांद्रे पूर्व परिसरात गोंधळाचे वातावरण
तुम्हाला मुंबई गिळायची आहे का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे गटाचे आमदार म्हणून सरदेसाई हे चांगलेच संतापले आहेत. वांद्रे पूर्व भागातील भारतनगर येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या पाडकामाला वरून सरदेसाई यांनी कडाडून विरोध केला आहे. या कारवाईमुळे वांद्रे पूर्व परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भेट दिली. या माध्यमातून प्रशासन दादागिरी करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील जमीनीबाबत कायद्यानुसार ही कारवाई होत नसून केवळ मुंबईतील जागा गिळायची आहे. त्यातूनच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वांद्रे पूर्व येथील भारतनगर भागात असलेल्या अनधिकृत बांधकामावर या एसआरएच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात या परिसरात जेसीबी दाखल झाला असून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात 178 घरांना एसआरएकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या विरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. या परिसरात रहिवासी 40 वर्षाहून अधिक काळापासून या घरांमध्ये राहतात. त्यामुळे अचानक कारवाई का? असा प्रश्न रहिवासांनी उपस्थित केला आहे. मात्र एसआरए प्रकल्पासाठी ही जागा ताब्यात घेण्यात आली असल्याची नोटीस या घरांना देण्यात आली असून पाडकामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रशासनाने माणुसकीला धरून काम करावे, अशी मागणी केली आहे. इथे राहणाऱ्या नागरिकांसोबत आधी घरांच्या संदर्भात ॲग्रीमेंट करा आणि मग विकास करा, असे देखील सरदेसाई यांनी म्हटले आहे. यांना मुंबई गिळायची आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 1970 पासून नागरिक या ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत आधी ॲग्रीमेंट करायला हवे होते, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.