आदित्य ठाकरेंचा केवळ 8801 मतांनी विजय, गेल्या वेळी 67 हजार:शिवसेनेचा बालेकिल्ला थोडक्यात बचावला? काय होती कारणे?
वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना 63,324 मते मिळाली आहेत. त्यांनी केवळ 8801 मतांनी विजय मिळवला. तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांना 54,523 मते मिळाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना 19,367 मते मिळाली आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा 67 हजारांवर मतांनी पराभव केला होता. त्यामुळे हा आदित्य ठाकरे यांचा निसटता विजय मानला जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी मतदारसंघातून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे 2019 मध्ये देखील विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा 67 हजारांवर मतांनी पराभव केला होता. आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच विधानसभेत पोहोचला होता. आदित्य यांना 89,248 तर राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना 21 हजार 821 मते मिळाली होती. तर ‘नोटा’चा पर्याय 6,500 लोकांनी स्वीकारला होता. वरळीत व्हायरल झालेल्या बनावट पाठिंबा पत्राने संभ्रम यंदा विधानसभा निवडणुकीत वरळीत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला होता. वरळी मतदारसंघही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. येथे आदित्य ठाकरे यांची मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदेसेनेचे मिलिंद देवरा यांच्याशी लढत झाली. तिन्ही उमेदवारांच्या अजेंड्यावर हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा होता. मतदानाच्या दिवशी शिंदेसेनेकडून मनसेच्या पाठिब्यांचे पत्र व्हायरल झाल्याने मतदार संभ्रमित झाले होते. त्यामुळे निकालावर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे. तसा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे. मतदारसंघाचा इतिहास शिवसेना (उद्धव गट) 25 वर्षांपासून सत्तेवर आहे, आतापर्यंत 6 निवडणुका जिंकल्या आहेत. वरळीत मराठी, कोळी आणि उच्चवर्गीय लोकांचे प्राबल्य आहे. दलित आणि गुजराती मतदारांची संख्याही चांगली आहे. मुंबईतील प्रसिद्ध बीडीडी चाळही याच परिसरात असून, त्यामध्ये 10 हजारांहून अधिक कुटुंबे राहतात. धारावीच्या धर्तीवर या परिसराचाही पुनर्विकास करण्यात येत आहे. 1962 ते 1972 अशी 10 वर्षे काँग्रेसने ही जागा जिंकली होती. 1978 मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार येथे विजयी झाला. त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस आणि 1985 मध्ये अपक्ष विजयी झाले. 1990 च्या दशकात ही जागा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकली आणि 2004 पर्यंत ती राखली. 2009 मध्ये या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांनी निवडणूक जिंकली होती. गेल्या दोन निवडणुकांपासून शिवसेना (उद्धव गट) या जागेवर सातत्याने विजय मिळवत आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले सचिन अहिर आणि सुनील शिंदे आता शिवसेनेत (उद्धव गट) आहेत. 2019 मध्ये शिवसेनेचे (उद्धव गट) आदित्य ठाकरे यांनी येथून निवडणूक जिंकली होती. आताही त्यांनी या जागेवर निसटता विजय मिळवला आहे. विजय अवघड होण्याची कारणे… परिणामकारक ठरले अनेक मुद्दे सर्वात महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे वरळीत या वेळी मतदानाच्या पद्धतीत झालेले बदल. 2019 मध्ये हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते. मात्र, या वेळी ही व्होट बँक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागली गेली. राज ठाकरे आणि मनसेवर विश्वास ठेवणारा मतदार गेल्या वेळी आदित्य ठाकरेंसोबत एका खास कारणासाठी होता, तो या वेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. तसेच देवरा यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचा त्यांनाही फायदा झाला.