अयोध्या : राम मंदिराचं बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. जानेवारी महिन्यातील अखेरच्या आठवड्यात राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं पुजारी नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. ट्रस्टनं पुजारी पदाच्या २० जागांसाठी जाहिरात दिली होती. पुजारी पदासाठी एकूण ३ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. राम मंदिरातील पुजारी पदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी २०० जणांची निवड मुलाखतीसाठी केली जाणार आहे. ही निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे, असं ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मुलाखतीची प्रक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील मुख्यालयात म्हणजेच कारसेवक पुरम येथे पार पडेल. २०० जणांना मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे. वृंदावन येथील जयकांत मिश्रा, मिथिलेश नंदिनी शरण आणि सत्यनारायण दास हे तिघे उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीतून ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना पुजारी पदावर नियुक्ती दिली जाईल. सहा महिन्याच्या निवासी प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. ज्यांची निवड होणार नाही त्यांना देखील प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिलं जाईल, असं गोविंद देव गिरी यांनी सांगितलं. ते ट्रस्टचे खजिनदार आहेत. भविष्यात पुजारी पदाच्या संधी निर्माण झाल्यास त्यांचा प्राधान्यानं विचार केला जाऊ शकतो. संध्या वंदन म्हणजे काय? राम मंदिरात कोणत्या मंत्रांचं उच्चारण करायचं, त्याची प्रक्रिया काय? कर्मकांड कशा स्वरुपाचं असेल, या संदर्भातील प्रश्न मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांना विचारले जाणार आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणामध्ये धार्मिक अभ्यासक्रम असेल. प्रशिक्षणादरम्यान पुजारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना मोफत जेवण, निवासस्थान आणि दरमहा २ हजार रुपये विद्यावेतन दिलं जाईल. Read Latest And