छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहरानंतर संपूर्ण जिल्ह्याचंही नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नावही छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद शहराप्रमाणेच जिल्ह्याचंही नाव आता धाराशिव झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने काल (१५ सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलली आहेत.
यापुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव, तर औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शहरात आयोजित केलेली मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव केलं होतं. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. मात्र आता राजपत्र जारी करुन त्यात बदल करण्यात आले आहेत.
काय आहेत नवीन नावं?
औरंगाबाद विभाग – छत्रपती संभाजीनगर विभाग
औरंगाबाद जिल्हा – छत्रपती संभाजीनगर जिल्हा
औरंगाबाद उप-विभाग – छत्रपती संभाजीनगर उप-विभाग
औरंगाबाद तालुका – छत्रपती संभाजीनगर तालुका
औरंगाबाद गाव – छत्रपती संभाजीनगर गाव
उस्मानाबाद जिल्हा – धाराशिव जिल्हा
उस्मानाबाद उप-विभाग – धाराशिव उप-विभाग
उस्मानाबाद तालुका – धाराशिव तालुका
उस्मानाबाद गाव – धाराशिव गाव