म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मित्रांनी हुक्का पिण्यासाठी बोलावून घेत त्यानंतर एका मित्राच्या घरी नेत छेड काढल्याने मानसिक तणावात गेलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना कल्याण पश्चिमेकडील परिसरात घडली. या मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात धाडण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तिच्याबरोबर नेमके काय घडले याचा उलगडा होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. कल्याण पश्चिमेतील एका सोसायटीत राहणारी १६ वर्षीय मुलगी शुक्रवारी काही कारणास्तव घराबाहेर गेली होती. मात्र, परतल्यावर ती अचानक नि:शब्द झाली होती. आईवडिलांसह भावाने वारंवार विचारणा केल्यानंतरही एक शब्दही न बोलणाऱ्या या मुलीवर प्रचंड मानसिक तणाव असल्याचे स्पष्ट दिसत होते. अखेर भावाने विश्वासात घेऊन तिला विचारले असता तिने मित्रांनी गैरकृत्य करीत छेड काढल्याचे सांगितले. हे सांगताना तिला रडू फुटले होते. यानंतर काय करावे या विचारात भाऊ घराबाहेर पडला.
जमिनीखालून रडण्याचा आवाज, एक पाय दिसला अन् सारेच हादरले, खोदून पाहिलं तर… थोड्या वेळाने परत घरी येऊन त्याने पाहिले असता बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे भावाला जबर मानसिक धक्का बसला. याची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार आणि महिला पोलिस अधिकारी दीपाली वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत या मुलीचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात धाडला. तर, नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणी, तिचे मित्र यांची तातडीने चौकशी सुरू केली. या चौकशीत या मुलीला चार दिवसांपूर्वी तिच्या दोन मित्रांनी मॉलमध्ये फिरायला जाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतल्याचे समोर आले. मॉलच्या बाजूला यापैकी एका मित्राचे घर आहे. त्या ठिकाणी सर्व जण जमले. तिथे या मुलीचे मित्र आणि त्या मित्रांचे दोन मित्र असे चार जण होते. या चौघांनी मुलीची छेड काढली. यानंतर तिला याबाबत काहीही घरी सांगू नकोस, असे धमकावले.
काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी प्रचंड धास्तावली होती. या तणावातून तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात पोक्सासह भादंवि ३०६, ३५४, ३४, ८, १२ या कलमांखाली चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.