मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांमधील भारताच्या अपयशाची मालिका कायम राहिली. २०१३ पासून भारतानं आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेला विजेतेपदाचा दुष्काळ यंदा संपेल अशी आशा होती. भारतानं सलग १० सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारल्यानं अपेक्षा वाढल्या होत्या. पण भारतीय संघ अंतिम सामन्यात ढेपाळला आणि अपयशाचा सिलसिला कायम राहिला. या पराभवानंतर संघातील २ खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.टी-२० मध्ये जबरदस्त फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय प्रकारात पुन्हा अपयशी ठरला. एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सातत्यानं फ्लॉप गेला आहे. वर्ल्डकपमध्येही सूर्याला समाधानकारक फलंदाजी करता आलेली नाही. यंदाच्या स्पर्धेत भारतीय फलंदाजी फॉर्मात होती. त्यामुळे सूर्यावर फारशी जबाबदारी आली नाही. त्याला क्वचितच फटकेबाजीची संधी मिळाली. पण त्यातही त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. ७ सामन्यांत त्यानं १७ च्या सरासरीनं १०६ धावा केल्या. अंतिम फेरीत भारतीय फलंदाजी ढेपाळली. या परिस्थितीत सूर्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते.भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंना घेऊन खेळला. दोघांची कामगिरी उत्तम झाली. त्यांनी वेगवान गोलंदाजांना चांगली साथ दिली. अंतिम सामना वगळता अन्य सगळ्यात सामन्यांमध्ये फिरकीपटूंच्या नावावर किमान एक विकेट होती. त्यामुळे अश्विनला संधी मिळाली नाही. अक्षर पटेलला दुखापत झाल्यानं १५ सदस्यीय संघात अश्विनला संधी मिळाली. त्याला केवळ एकाच सामन्यात खेळवण्यात आलं. अश्विनचं वाढतं वय लक्षात घेता बीसीसीआय त्याला शिखर धवनप्रमाणे एकदिवसीय संघातून डच्चू देऊ शकते.