निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवारांचा शरद पवारांवर आरोप:माझ्या विरोधात पुतण्या तर आत्रामांविरोधात मुलीलाच उभे केले
माझ्या विरोधात माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाला म्हणजे माझ्या सख्ख्या पुतण्याला उभे करण्याचे काहीच कारण नव्हते. बारामतीमध्ये इतरही अनेक उमेदवार होते. लोकसभा निवडणुकीत माझी चूक झाली हे मी आधीच सांगितलं होते. मात्र, तरी देखील माझ्या विरोधात माझा सख्खा पुतण्या उभा केला. अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात खूप काम केले आहे. त्याची आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र युगेंद्र पवार यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. ते व्यवसाय करणारे आहेत. मात्र तरीसुद्धा शरद पवार यांनी त्यांनाच माझ्या विरोधात उभा केले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे धर्मराजबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्या स्वतःच्या मुलीला उभे केले. माझ्या विरोधात सख्खा पुतण्या उभा केला, अशा अनेक ठिकाणी शरद पवार यांनी घरातली माणसे काढून उभे केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आमचे शिंगणे यांच्या विरोधात देखील सख्या पुतणीला उभे करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, तेच तिकडे गेल्याने तसे झाले नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असला तरीसुद्धा कोणाला उमेदवारी द्यायची, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तो व्यक्ती समाजात काम करणारा असेल, समाजातील जनतेची तशी मागणी असेल, तर गोष्ट वेगळी. मात्र घरातील कोणालातरी विरोधात उमेदवारी द्यायची, हे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर अजित पवार यांनी यावेळी ईव्हीएम वर विरोधकांनी केलेल्या आरोपांचा देखील समाचार घेतला. ज्यावेळेस महाविकास आघाडीचा विजय होतो, त्यावेळेस तो जनतेचा कौल असतो. आणि युतीचा विजय झाला की ईव्हीएम मशीनला दोष दिला जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला होता, तो आम्ही मोठ्या मनाने स्वीकारला होता. असे त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला हवा, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. अजित पवार- रोहित पवारांची प्रितीसंगमावर अचानक भेट:कांकांचा पुतण्याला इशारा; ‘वाचलास… माझी सभा झाली असती तर….’ विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड मधील प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की, ‘बेट्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर…’ असे म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. पूर्ण बातमी वाचा….