अजित पवारांना मुख्यमंत्री करावे:कोणतेही खाते चालेल पण मला मंत्री करा, नरहरी झिरवळांनी केली इच्छा व्यक्त
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या व महायुती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार यावर शिक्कामोर्तब झाला. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत राज्यात पाहायला मिळाली. महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. सरकार तर स्थापन करणार, मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व मावळत्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत नरहरी झिरवाळ एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले, माझी, महाराष्ट्रातल्या युवकांची, लाडक्या बहिणींची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. ही जनतेची इच्छा आहे. दिलेला शब्द कधीच परत न घेणारा माणूस अशी अजित पवारांची ख्याती आहे. कामाचा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण महायुतीचे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, राज्यातले देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, स्वत: अजित पवार हे सगळे मिळून जो निर्णय घेतील, तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. पण आमची विनंती असेल की अजित पवारांना एकदा मुख्यमंत्री करावे. पुढे बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. पण भाजपाचे संख्याबळ मोठे आहे. पण तरीही आमची विनंती आहे की अजित पवारांना मुख्यमंत्री करावे. बघू. अजित पवारांनी 11 वेळा अर्थखाते चालवले आहे. इतक्या वेळा उपमुख्यमंत्री राहिले. आता एकदा मुख्यमंत्री करून तर बघावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आणि विनंती आहे, असेही झिरवाळ म्हणाले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात तसेच यावेळी बोलताना नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन होऊ शकतो, असे सूचक विधान देखील केले आहे. झिरवळ म्हणाले, शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीनही होऊ शकतो. त्यात वावगे काहीही नाही. राजकारणात कोण कधी कोणाचा शत्रू, कधी मित्र या गोष्टी चालूच असतात, असे झिरवाळ म्हणाले. मला एखादे मंत्रीपद द्यावे नरहरी झिरवाळ यांनी मंत्रीपदाची देखील इच्छा व्यक्त केली आहे. झिरवाळ म्हणाले, मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानभवन असे सगळे केले आहे. आता माझी एकच इच्छा राहील की मला एखादे मंत्रीपद द्यावे. मी मंत्रालयात रोज जातो. पण स्वत:चे असे काही तिथे असावे यासाठी मी ही मागणी करतोय. मला कोणतेही खाते दिले तरी चालेल, पण मंत्री करावे अशी माझी विनंती आहे. मला ते मिळेल असा माझा विश्वास आहे. मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे, असेही नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.