अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते अपघाती नेते:संजय राऊत यांची टीका; भाजप माफिया पक्षाला सांभाळत असल्याचा आरोप
अजित पवार हे महाराष्ट्राचे नेते नाहीत तर ते अपघाती नेते असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष माफिया मित्र पक्षाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील निशाणा साधला. धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यासाठी पुरावे नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. आम्हाला देखील पुरावे नसताना जेलमध्ये टाकले होते. तेव्हा अजित पवार बोलले नाहीत. आता कोणत्या पुरावाची गोष्टी अजित पवार करत आहेत? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला. या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी देखील राऊत यांनी केली आहे. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाचा आणि माफियागिरी यांच्या तपासाचा फास सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राऊत यांनी आव्हान दिले. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफीयाकरण होईल, असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून सत्ता निघून जाईल, असा इशारा देखील संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला आहे. बीड मधील संपूर्ण पोलिस खाते बरखास्त करा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड बाहेर चालवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी मधील प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांची तपासणी करायला हवी. तो गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित आहे का? याची पाहणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. अजित पवारांवर निशाणा अजित पवार यांनी भारतीय संविधानात असलेला पुरावा कायदा बदलला का? हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली. अजित पवार हे नेते नाहीत तर ते अपघाती नेते असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केवळ भाजपच्या कृपेमुळे त्यांना ही जागा मिळाली आहे. ते जर नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर बीड प्रकरणातून त्यांनी आपल्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळले असते. जोपर्यंत न्यायालय त्यांना निर्दोष मुक्त करत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे होते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.