आर. आर. पाटलांनी केसाने गळा कापला:आबांवर आरोप केल्यानंतर अजित पवार म्हणतात – जे पटले ते बोललो, आता विषय संपला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कथित सिंचन घोटाळ्याचे खापर राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर फोटले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संतप्त सूर उमटत असताना अजित पवारांनी आता हा विषय आपल्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केले आहे. मी माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटले ते बोललो, पण आता हा विषय माझ्यासाठी संपला आहे, असे ते म्हणालेत. अजित पवार यांची नुकतीच सांगली येथे एक सभा झाली होती. या सभेत बोलताना त्यांनी सिंचन घोटाळ्यात आर. आर. पाटील यांनी आपला केसाने गळा कापल्याचा गंभीर आरोप केला होता. माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्याची खुली चौकशी करण्याच्या फाईलवर आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही फाईल मला दाखवली. आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले होते. काय म्हणाले अजित पवार? अजित पवार यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. याविषयी पत्रकारांनी गुरुवारी अजित पवार यांना छेडले असता त्यांनी माझ्या दृष्टिने हा विषय संपल्याचे नमूद करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जे काही व्हायचे होते ते झाले. आता मला ते पुन्हा उखरून काढायचे नाही. माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटले तेच मी सांगितले. त्याचा व निवडणुकीचा कोणताही संबंध नाही. माझ्या दृष्टिने आता हा विषय संपला आहे, असे ते म्हणाले. रोहित पाटलांनी केला होता पलटवार दुसरीकडे, आर. आर. पाटील यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांवर सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आर. आर. पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे व स्वच्छपणे काम केले. राज्याच्या गृहमंत्रीपदी असताना त्यांनी पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली. एवढ्या वर्षांनी त्यांच्यावर झालेले आरोप पाहून अतिशय दुःख झाले. अजित पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटते. आबा हयात असते तर त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले असते. पण आबांनी डान्स बार बंदीसारखे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असतानाही ते डान्सबार बंदीवर ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे हा विचार त्यांनी त्यावेळी मांडला. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्याला आता जनताच उत्तर देईल, असे रोहित पाटील यांनी म्हटले होते.