अजित पवार यांच्या पक्षालाच का टार्गेट करता?:सुप्रिया सुळे यांचा युतीतील नेत्यांना प्रश्न; महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे का?

उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षातील लोक अजित पवार यांच्या पक्षालाच का टार्गेट करतात? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडे प्रकरणावरून त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. अजित पवार यांच्या पक्षाला सत्ताधारी पक्षातीलच नेतेच टार्गेट करून टीका करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या संदर्भामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती मधील होत असलेल्या या आरोप- प्रत्यारोपाविषयी विषय शंका व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याच पक्षावर जास्त अटॅक का होतो? मग धनंजय मुंडे असो किंवा इतर किती अनेक नेते आपण दाखवू शकतो. या सर्वांमध्ये अजित पवार यांच्या पक्षालाच टार्गेट केले जातेय का? असे मला सतत वाटत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी लोक जास्त अटॅक करत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन विधानसभा निवडणूक लढला होतात, असे असताना केवळ अजित पवार यांना टार्गेट का केले जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उभी फुट पडल्यानंतर अजित पवार हे महायुती तर शरद पवार हे महाविकास आघाडी मध्ये सामील झाले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला चांगले यश मिळाले होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाला महायुतीच्या माध्यमातून चांगले यश मिळाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शरद पवार हे देखील आता अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सोबत येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनी केला होता शरद पवारांना फोन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना धावपळ न करता तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही दिवसात सातत्याने एकाच व्यासपीठावर येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या दरम्यान त्यांच्यामध्ये कोणतेच संभाषण झाले नसल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली होती. तर नंतरच्या काळात अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली होती.