अजित पवारांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट:दोघात जवळपास एक तास झाली चर्चा, बीड प्रकरणावर निर्णय होण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली असल्याचे समजते. सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अजित पवार यांचे जवळचे मानले जाणारे मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहेत. तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील मागितला जात आहे. याच विषयावर अजित पवार आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड सध्या देशाच्या पातळीवर चर्चेत आले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. आरोपी वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तसेच महायुतीच्या सरकारवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील सुरुवातीपासून नजर आहेच. त्यामुळे आता अमित शहा यांनी या प्रकरणी अजित पवारांकडून माहिती घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली येथे होते. मात्र, त्यांचा तेथील कार्यक्रम निश्चित नव्हता. प्रफुल्ल पटेल यांच्या घरून निघून अजित पवार यांनी थेट अमित शहा यांचे निवासस्थान गाठले. यावेळी ही भेट पालकमंत्री पदासाठी असल्याचे जरी सांगण्यात आले असले तरी यात बीडच्या प्रकरणावर निश्चितच चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, बीड प्रकरण चर्चेत आल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी व राज्यमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील या पूर्वी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीत देखील बीडचा मुद्दाच केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. तसेच अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आरोप विरोधक करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली असल्याचे समजते. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवार यांनी ही भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. विरोधकच नव्हे तर महायुतीमधील आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता यावर निर्णय काय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.