अजित पवार यांचा चेहरा खुलला:म्हणाले – महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला; शरद पवारांहून केली सरस कामगिरी, पाहा PHOTO
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या चमकदार कामगिरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा चेहरा चांगलाच खुलला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाहून सरस कामगिरी केल्यामुळे अजित पवारांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जल्लोष व्यक्त केला. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने सर्वाधिक 218 जागांवर आघाडी घेतली असून, त्यात भाजपने सर्वाधिक 126, शिवसेना 54 व राष्ट्रवादी काँग्रेसने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने 51 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेसने 19, ठाकरे गटाने 19 तर शरद पवार गटाने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. अजित पवार यांनी एका ट्विटद्वारे या निवडणुकीतील आपल्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जनतेने गुलाबी रंगाला पसंती दर्शवल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्या हातात गुलाबी रंगाची फुलेही दिसून येत आहेत. अजित पवारांनी संपूर्ण निवडणुकीत प्रचाराची एक खास रणनीती आखली होती. त्यांनी संपूर्ण प्रचारात गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. गुलाबी रंगाच्या गाड्या, गुलाबी रंगाच्या पोस्टर्सचाही त्यांनी चपखल वापर करून महिला वर्गाला आपल्याकडे खेचण्यात यश मिळाले होते. त्यामुळेच आता अजित पवार यांनी महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला असे ट्विट केले आहे. सहकाऱ्यांसोबत केला आनंद व्यक्त या निकालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला स्फुरण चढले आहे. विशेषतः अजित पवार यांचाही आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. यामुळे त्यांनी मुंबई येथील आपल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत आनंद व्यक्त केला. शरद पवारांच्या पक्षाला दाखवले अस्मान विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी लेखली जात होती. लोकसभा निवडणुकीतील अत्यंत सुमार कामगिरीनंतर ही शक्यता वाढली होती. त्यातच राजकीय विश्लेषकांनीही अजित पवार गटाची या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे सावट पसरले होते. पण प्रत्यक्ष निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला अस्मान दाखवत आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादीच्या या यशानंतर पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. याऊलट शरद पवारांच्या पक्षात मात्र निरव शांतता दिसून येत आहे. दुसरीकडे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महायुतीने ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्याची घोषणा केली. पण आता प्रत्यक्ष निवडणूक निकालात मिळालेल्या प्रचंड यशामुळे मुख्यमंत्रीपदी भाजपचाच नेता बसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत भाजपला घवघवीत यश विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीतील भाजपची हाराकिरी व मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ही शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व अधिकच झळाळून निघाले आहे. विशेष म्हणजे भाजप नेतृत्वानेही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वाला पसंती दर्शवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी त्यांचे नाव घेतले होते. यामुळेही फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे मानले जात आहे.