ड्रोन हल्ल्यानंतर गावातील सर्व 17 कुटुंबांचे पलायन:मणिपूर तणाव, सुरक्षा नसल्याने नागरिकांत भीती
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी कुकी-जो समुदायाची स्वतंत्र प्रशासनाची मागणी फेटाळल्यानंतर पुन्हा हिंसाचार भडकला आहे. इंफाळच्या पश्चिमेकडील जिल्ह्यातील कौत्रुक गावासह तीन गावात रविवारी रात्री सशस्त्र बंडखोरांनी ड्रोनने हल्ला केला होता. त्यानंतर कौत्रुक गावातील सर्व १७ कुटुंबांनी घरेदारे सोडून गावातून पलायन केले. हल्ल्यानंतर कौत्रुकचे लोक जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी अर्थात इंफाळ, खुरखुल व सेक्माईला निघून गेले आहेत. लोकांमध्ये भीती पसरली आहे. पुन्हा एकदा मोठ्या पातळीवर हिंसाचार होईल, अशी त्यांना भीती वाटते. कौत्रुकचे रहिवासी प्रियोकुमार म्हणाले, हल्ल्यात गावातील डोंगराळ भागात वसलेल्या घरातील लोक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले. गावात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीती आहे. सध्या गावात राज्य पोलिस तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. ते म्हणाले, तणाव असल्याने शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाहीत. सुरक्षा व्यवस्था झाली नाही तर शेतकरी या हंगामात भातशेती करू शकणार नाहीत. शेतकऱ्यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. कौत्रुक व परिसरातील भागात हिंसाचार भडकल्याने विद्यार्थ्यांमध्येही भीती आहे. बीरेन यांच्या जावयाने केली सीआरपीएफ हटवण्याची मागणी मणिपूरचे भाजप आमदार व मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचे आमदार राजकुमार इमो सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले. त्यातून केंद्रीय सुरक्षा दलास माघारी बोलावण्याची विनंती केली आहे. सुरक्षेची जबाबदारी राज्य सुरक्षा विभागाची आहे. मणिपूरमध्ये सुमारे ६० हजार केंद्रीय दलाच्या तैनातीमुळे शांतता स्थापनेत अडसर येत आहे. म्हणूनच अशा तैनातीला हटवावे. मणिपूर सरकारने राज्य पोलिसांना इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सीमेजवळ तपास अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस महासंचालकांनी ड्रोन हल्ल्यात सामील लोकांना अटक करणे आणि कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.