मुंबई : मर्द असाल आणि हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानातील सभेत बोलताना भाजपला दिलं. त्यांच्या याच आव्हानाला मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार उत्तर दिलंय. तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे आमच्या मतांवर वरळीचा आमदार म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे शिवसेना मर्दांची असेल तर अगोदर पेंग्विनसेना प्रमुखाला राजीनामा द्यायला सांगा, असा पलटवार आशिष शेलार यांनी ठाकरेंवर केला आहे.

मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही गिधाडं मुंबईवर घिरट्या घालत आहेत. पण मुंबईचा आणि कमळाबाईचा संबंध काय? असा थेट सवाल करत हिंदू मुस्लिम भेद करुन दाखवा, मुस्लिम बांधव शिवसेनेसोबत आहे. मराठी-अमराठी भेद करा, अमराठी बांधव आमच्यासोबत आहेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावरुन भाजपला ललकारलं तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ‘ट्रेलर’ दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीतलं आतापर्यंत सर्वांत आवेशपूर्ण भाषण असल्याची प्रतिक्रिया उपस्थित शिवसैनिक आणि राजकीय वर्तुळातले लोकही व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

पाटलीनीची भाषा करु नका

“आमच्या जीवावर निवडून यायचं. दुसऱ्यासोबत सरकार बनवायचं आणि ते पडलं की विद्यमान सरकार बरखास्त करुन दाखवा म्हणून आव्हान द्यायचं, ही पाटलीनीची भाषा योग्य नव्हे. आव्हान द्यायचंच असेल तर लुकड्या तुकड्या महाविकास आघाडीबरोबर जाऊन आमच्याविरोधात निवडणूक लढा आणि आमच्याशी दोन हात करा. उगीच पाटलीनीची भाषा करु नका”, अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

त्यांना जनतेने कायमचं घरी बसवलं

उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्यावरही टीका करतांना शेलारमामांचं उदाहरण दिलं होतं. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, “मी शेलार मामांच्या कुळातील, वंशातील आहे, याचा मला अभिमान आहे. महाराजांनी जे जे काम सांगितलं ते शेलारमामांनी इमाने इतबारे केलं. ते कधी घरात बसले नाहीत. पण आमच्यावर टीका करणारे कधी घराबाहेरच पडले नाहीत. इतिहास असो सांगतो की जे घरात बसले त्यांना जनतेने कायमचं घरी बसवलं”Source link

Leave a Reply

Your email address will not be published.