म. टा. वृत्तसेवा, अमरावतीः एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे चांदूर रेल्वे शहरातील गारोडीपुरा येथे घडली. नईम खान रहमान खान (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २१ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता आरोपी नईम खान व त्याचे तीन साथीदार विना क्रमांकाच्या तवेरा गाडीतून पीडित मुलीच्या घरी आले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवित अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने ओढून वाहनात बसवून घेऊन गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांच्या चार पथकांकडून पीडित मुलीचा व आरोपींचा शोध सुरू होता. तसेच मुलीला परत आणून द्या व आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या दरम्यान मुख्य आरोपी नईम खान व त्याच्या साथीदारांनी पीडित मुलीला तिच्या घराजवळ आणून सोडले व ते निघून गेले. यानंतर एका तासाने पहाटे तीन वाजताच्या दरम्यान आरोपी नईम खान हा गारोडीपुरा येथे आला. शस्त्राचा धाक दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करीत होता. यावेळी चार आरोपींनी धारदार शस्त्राने नईमच्या छाती तसेच डोळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नईमला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी मोईन खान रहमान खान यांच्या तक्रारीवरून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चांदूर रेल्वे पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती यांनी संयुक्तपणे तपास करीत चार आरोपींना अटक केली. दीपक रतन पवार (वय २८), साजिद उमर उर्फ पप्पू आरिफ शेख (वय ४१), अमजद खान युसूफ खान (वय २७) व मोहम्मद हाफिज मोहम्मद कादर (वय ४२) अशी आरोपींची नावे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदाळे यांच्या मार्गदर्शनात चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी करीत आहे. मृतक नईम खान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.