अमरावतीत उघडणार राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा:सिपना अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात 13 डिसेंबरपासून आयोजन
नाट्य निर्मिती संस्था आणि नाट्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारी राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. पुढील महिन्याच्या १३ तारखेपासून येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ही स्पर्धा सुरू होत असून, ती तब्बल १४ दिवसानंतर म्हणजे २६ डिसेंबरला समाप्त होईल. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य नाट्य स्पर्धेसह विविध कामे काहीशी रखडली होती. परंतु आचारसंहितेचा अडसर दूर झाल्याने आता एकेक बाब खुली होत आहे. त्याच अनुषंगाने राज्याच्या कला संचालनालयातर्फे आयोजित केली जाणारी आणि काहीशी लांबलेली राज्य नाट्य स्पर्धाही सुरू होत आहे. या स्पर्धेच्या स्थानिक समन्वयाची जबाबदारी गतवर्षीचे सह समन्वयक विशाल फाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘मोठ्यांचा शेक्सफियर’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ होईल. सुदर्शन खोत लिखित आणि आकाश पांडे दिग्दर्शित हे नाटक येथील विदूषक प्रतिष्ठान या नाट्य संस्थेतर्फे सादर केले जाणार आहे. त्यानंतरची बहुतांश नाटकेही स्थानिक लेखकांनीच लिहिली असून, दिग्दर्शन व प्रकाश योजनेसह नेपथ्यही स्थानिक कलाकारांनीच केले आहे. मोठ्यांचा शेक्सफियर या नाटकाने शुभारंभ राज्य नाट्य स्पर्धेचा शुभारंभ मोठ्यांचा शेक्सफियर या नाटकाने होणार आहे. दुसऱ्या दिवशी वैभव देशमुख लिखित स्वधर्म हे नाटक सादर केले जाईल. त्यानंतर आला रे राजा, दसवा, पुत्रकामेष्ठी, ‘द व्हल्टर अँड द लिटील गर्ल’, काली, थलाई कुत्थल, उत्खनन, अनिमा, होमीसाईड, कमला आणि अंधारडोह ही नाटके सादर केली जाणार आहेत.