नाराज राजन साळवींकडून विनायक राऊतांची तक्रार:उद्धव ठाकरे संतापले; भाजपात जायचे तर जा म्हणत साळवींना सुनावले

नाराज राजन साळवींकडून विनायक राऊतांची तक्रार:उद्धव ठाकरे संतापले; भाजपात जायचे तर जा म्हणत साळवींना सुनावले

शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. त्यावर विनायक राऊतांना पक्षातून काढू का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी राजन साळवींना केला, अशी माहिती आहे. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचे असेल तर जा, अशा शब्दांत साळवींना सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार राजन साळवी लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ते नाराज असून भाजप किंवा शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सर्व अफवा असून मी कायम बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक राहणार असल्याचे साळवी यांनी 2 दिवसांपूर्वी म्हटले. या माध्यमातून त्यांनी पक्षांतराची शक्यता फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मातोश्रीवर नेमके काय झाले?
राजन साळवी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरच्या आपल्या भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्या. दोघांमध्ये मातोश्रीवर पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी राजन साळवी यांच्यासोबत तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. या भेटीत राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊतांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. विधानसभेत झालेल्या पराभवाला विनायक राऊत हेच जबाबदार आहेत, असा आरोप साळवींनी केला. तसेच विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुखांचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याशी चांगले संबंध आहेत, असा दावाही राजन साळवी यांनी केला. उद्धव ठाकरे साळवींमध्ये खडाजंगी राजन साळवी यांनी केलेल्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? असा उलट प्रश्न राजन साळवींना विचारला. त्यावर विनायक राऊतांना मी 21 हजारांची लीड दिली, त्यामुळे मी जबाबदार कसा? असा उलट प्रश्न उद्धव ठाकरेंना केला. राजन साळवींच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याची माहिती आहे. तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचे? विनायक राऊतांना पक्षातून काढू की, जिल्हा प्रमुखाला काढू? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर राजन साळवी यांनी तो आपला निर्णय आहे, असे उत्तर दिल्याची माहिती आहे. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचे असेल तर जा, अशा शब्दांत ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment