अण्णा हजारेंचा मतदनाच्या दिवशीच अरविंद केजरीवालांवर निशाणा:म्हणाले- तो स्वार्थी, त्याऐवजी शुद्ध आचार, विचार आणि त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा

‘अरविंद केजरीवाल हा स्वार्थी माणूस आहे’ त्याऐवजी शुद्ध आचार, विचार आणि जीवनात त्याग करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे आज मतदान सुरू आहे. या दरम्यान आण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. यासंबंधी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, सुरुवातीला अरविंद केजरीवाल हा माझ्यासोबत होता. तेव्हा त्याची नियत साफ होती. मला वाटले की तो चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र त्याने पक्ष आणि पार्टी काढली. तेव्हापासून मी त्याची साथ सोडले असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. हा स्वार्थी माणूस असल्याचे मला समजले. त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती, त्यावेळी तो मला चांगला माणूस वाटत होता. त्यामुळेच दारू विरोधातील आंदोलनात देखील तो माझ्यासोबत होता. मात्र आता तोच दारू बाबत बोलत आहे. त्यामुळे मी त्याला सोडून दिले असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. अण्णा हजारे यांच्यामुळे अरविंद केजरीवाल समोर आला, असे काही लोक सांगतात. मात्र ही बाब चुकीची आहे. सुरुवातीला तो माझ्यासोबत होता, तेव्हा चांगला माणूस होता. मात्र नंतर मला जेव्हा समजले, तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, अशी टीका देखील अण्णा हजारे यांनी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केल्यामुळे याबाबतची चांगलीच चर्चा रंगली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे आवाहन अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना देखील मतदानाचे आवाहन केले आहे. ज्या उमेदवारांचे चरित्र चांगले आहे. ज्यांचे आचार, विचार चांगले आहेत. ज्यांची त्याग करण्याची वृत्ती आहे. हे सर्व पाहूनच दिल्लीकरांनी मतदान करावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीत 70 विधानसभेच्या जागा असून त्यासाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही 30 उमेदवार दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया ब्लॉकचा भाग असलेले पाच पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. यापैकी सर्व 70 जागांवर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. त्याच वेळी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) 6 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी (CPM) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी लेनिनवादी (CPI-ML) यांनी प्रत्येकी 2 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजपने 68 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. युती पक्षांना दोन जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये जनता दल-युनायटेड (JDU) ने बुरारी येथून आपला उमेदवार उभा केला आहे आणि लोक जनशक्ती पक्ष- रामविलास (LJP-R) ने देवली मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला आहे. महाराष्ट्रात भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) 30 जागा लढवत आहे. शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिला आहे. याशिवाय बहुजन समाज पक्ष (BSP) 70 जागांवर आणि असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) 12 जागांवर निवडणूक लढवत आहे. निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.