संतोष देशमुख हत्या प्रकरण:फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस, नाव गुप्त ठेवणार; पोलिस विभागाची घोषणा
मस्साजोगचे संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलिस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. प्रयत्न करून सुद्धा ते तिघे तपास यंत्रणेला गुंगारा देत असल्याने ते आरोपी निष्पन्न असून ते खुनासारखा गंभीर गुन्हा केल्यापासून फरार आहेत. त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिस दलातर्फे चालू आहे. या तिघा आरोपीतांच्या ठाव ठिकाणाची कोणास माहिती किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास त्यांनी आरोपींची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख किंवा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव अत्यंत गोपनिय ठेवण्यात येईल व त्याला योग्य ते बक्षिस देण्यात येईल. असे पोलिसांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.