बांगलादेशी सैनिकांचे दु:साहस; आसाममध्ये घुसून मंदिराचे बांधकाम रोखले:बीएसएफने हुसकावले, निर्मनुष्य जागेच्या बहाण्याने वाद, फ्लॅग मीटिंगनंतर शांतता
आसाममध्ये बांगलादेशलगतच्या सीमेवर तीन दिवसांपासून तणाव आहे. बांगलादेशचे बॉर्डर गार्ड (बीजीबी) कुशियारा नदीच्या अलीकडे भारतीय सीमेत सुरू असलेल्या मंदिर बांधकामावर वाकडी नजर ठेवून आहे. अर्थात, प्रत्युत्तरासाठी आपल्या बीएसएफचे जवानही दक्ष आहेत. प्रकरण आसामच्या श्रीभूमीचे आहे. या भागात कुशियारा नदीच दोन्ही देशांची सीमा निश्चित करते. नदीच्या दुतर्फा १५० मीटरचा भाग निर्मनुष्य आहे. येथे कोणत्याही बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागते. गुरुवारी बांगलादेशाच्या सिल्हेट डिव्हिजनच्या झाकीगंज पॉइंटवर तैनात बीजीबी जवानांचे पथक नदी ओलांडून श्रीभूमीवर घुसले. येथे नदीकिनाऱ्याच्या फॉरेस्ट रोडवर स्थानिक लोक माता मनसादेवीच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करत आहेत. बीजीबीने मजुरांना धमकावून काम थांबवले. मंदिर संचालन समितीच्या एका सदस्याने ‘दैनिक भास्कर’ला सांगितले की, बीएसएफला या घुसखोरीची माहिती दिली. त्यावर तत्काळ तेथे पोहोचलेल्या बीएसएफ पथकाने बीजीबीच्या जवानांना कडक शब्दात सांगितले की, मंदिर नो मॅन्स लँडपासून दूर आहे. त्यामुळे इथून जा. पण ते ऐकेनात. मग बीजीबीच्या अधिकाऱ्यांना बोलावले. सायंकाळी श्रीभूमीच्या सीमेवर कमांडंट स्तरावर फ्लॅग मीटिंग झाली. पुन्हा न सांगता सीमा ओलांडू नये, असा इशारा देण्यात आला. मग बीजीबी जवान मागे फिरले. सध्या बीएसएफच्या निगराणीत मंदिराचे काम सुरू आहे. श्रीभूमी जिल्ह्याची ९४ किमी सीमा बांगलादेशला जोडलेली आहे. यात ४३ किमी नदीकिनारा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेच्या ४ किमी क्षेत्रात कुंपण बांधलेले नाही.