बाबा आढावांचे मोफत योजना व EVM विरोधात आंदोलन:महाविकास आघाडीवरही साधला निशाणा; म्हणाले – काँग्रेस अदानीविरोधात, पण पवार सोबत
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी सरकारच्या मोफत योजना आणि विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले असून शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. वयाच्या ९५ व्या वर्षी बाबा आढाव यांनी आंदोलन करत सरकारला आव्हान दिले आहे. आढाव म्हणाले, निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. राज्यघटना व लोकशाहीची सुरु असलेली थट्टा चर्चाचा विषय झाला असून त्याचा निषेध करण्यासाठी मी आत्मक्लेश आंदोलन करत आहे. लोकशाही वाचवणे महत्वाचे असून त्याबाबत नागरिकांनी जागरुक होणे गरजेचे आहे. मोफत योजना हिताच्या नाहीत मी १९५२ पासून देशातील व राज्यातील प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार आहे. लाडकी बहीण योजना सारख्या मोफत पैसे वाटप योजना निवडणूक तोंडावरच का आणल्या गेल्या. त्याचप्रमाणे सरकार वेगवेगळ्या मोफत योजना देत असून त्या हिताच्या नाही. यंदाच्या राज्यातील निवडणुकीत पैशाचा धुडगूस करण्यात आला आहे. राज्यात ईव्हीएम घोटाळा देखील झाल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने देखील लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेत महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले, ही बाब देखील लांच्छनास्पद आहे. काँग्रेस अदानाविरोधात, पण पवारांचे काय? काँग्रेस एका बाजूला उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात आंदोलन करते. परंतु त्यांच्या सोबतचे सहकारी शरद पवार अदानी यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आपण आता स्वस्थ बसणार नसून आत्मक्लेश आंदोलन करत आहे. रोहित पवार, भुजबळांनी घेतली आढावांची भेट दरम्यान, बाबा आढाव यांची शुक्रवारी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी भेट घेतली. यापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ व आमदार रोहित पवार यांनी देखील आढाव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.