‘जय श्रीराम’च्या घोषात कलश यात्रा ठरली वेधक
अयोध्यानगरी मैदानात सोमवारपासून बागेश्वर धाम रामकथा कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, त्याची सुरुवात वेधक कलश यात्रेने झाली. क्रांतीचौकातून दुपारी निघालेल्या कलश यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. यात महिला; तसेच मुलांचा लक्षणीय सहभाग होता. ‘जय श्रीराम’च्या जयघोषात आणि विविध भक्तीगीतांमध्ये ही मिरवणूक हळूहळू अयोध्यानगरीकडे झेपावली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व इतर मंडळींच्या उपस्थितीत शहरातील क्रांतीचौकातून दुपारी एकच्या सुमारास कलश यात्रेला सुरुवात झाली. खास वेशभूषेत व डोक्यावर कलश घेऊन आणि माथ्यावर ‘जय श्रीराम’चा टिळा लावलेल्या महिला या यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. शिवाय केशरी धोतर-उपकरणे अंगावर घेतलेली मुलेही यात्रेत सहभागी झाली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. खास रथावर आरुढ झालेले भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमानाचे सजीव देखावे हेदेखील यात्रेचे आकर्षण होते. भगव्या पताका हाती घेतलेले आणि ओठी श्रीरामाचा जयषोघ जपत असंख्य भाविक या लांबलचक यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
या यात्रेत शहरवासीय होतेच; शिवाय बाहेरगावच्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. वाजत-गाजत निघालेली ही यात्रा हळूहळू अयोध्यानगरीकडे झेपावत असतानाच, भाविकांना पाण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आल्याचेही दिसून आले. चोख पोलिस बंदोबस्त व नियोजनामुळे वाहतुकीची समस्या फारशी निर्माण झाली नसल्याचेही दिसून आले.
यात्रेत शंखनाद, डमरुवादन
यात्रेत खास उज्जैनहून डमरुवादक आले होते, तर ओरिसातून शंखवादक आले होते. डमरुवादन आणि शंखनादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच; शिवाय यात्रेत उत्साह संचारल्याचे पावलोपावली दिसून आले.