बहिरमची यात्रा 20 डिसेंबरपासून, साफसफाईसह इतर कामांना प्रारंभ:19 डिसेंबरला मंदिरात पूजा, सर्वाधिक काळ चालणारी यात्रा
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यातील बहिरम येथे श्री बहिरम बाबांची यात्रा विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रा महोत्सवाला यंदा २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसाआधी १९ डिसेंबरला मंदिरात होमहवन व पूजा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य किशोर ठाकरे यांनी दिली आहे. बहिरम बाबांची यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरम्यान या यात्रेच्या देखरेखीची जबाबदारी अमरावती जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे यात्रा सुरू होण्यापूर्वी त्या ठिकाणी चांदूर बाजार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ईश्वर सातांगे यांनी आवश्यक त्या तयारीसाठी पाहणी केली व तयारी सुरू केली आहे. अशी माहिती यात्रा व्यवस्थापक निखिल नागे यांनी दिली. तसेच ९ ते ११ डिसेंबरपर्यंत या ठिकाणी यात्रेतील दुकानांसाठी जागेची लिलाव प्रक्रिया पंचायत समिती चांदूर बाजारकडून राबवण्यात येणार आहे. बहिरम हे ठिकाण मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी राहते. पूर्वी बहिरम यात्रेत मोठ्या प्रमाणात ‘तमाशा’ सादरीकरण व्हायचे, मात्र मागील काही वर्षांपूर्वी माजी आमदार बच्चू कडू यांनी यात्रेतील तमाशा केंद्र बंद केले. त्याऐवजी यात्रेत सर्वसामान्यांच्या सोईच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी आणून नागरिकांना शासकीय कामासाठी मदत होईल, असा स्तुत्य उपक्रम सुरू केला होता. बहिरम या ठिकाणी शिरसगाव कसबा पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. या यात्रेचा कालावधी जवळपास एक महिन्याहून अधिक असतो. त्यामुळे यात्रा काळातील महिनाभरातील प्रत्येक शनिवारी व रविवारी भाविकांची चिक्कार गर्दी या ठिकाणी राहते. हंडीतील मटन अन् रोडगे प्रसिद्ध यात्रेत हंडीतील मटन आणि रोडगे प्रसिद्ध आहे. खवय्यांसाठी ही यात्रा एक मेजवानी ठरते. हंडीतील मटन किंवा वांग्याची भाजी आणि रोडग्याचा स्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक या ठिकाणी येतात.