बांगलादेशच्या मुलीस पाच लाखांत मैत्रिणीनेच विकले:पुण्याची घटना, बुधवार पेठेतून तरुणी पोहोचली पोलिसांत

मैत्रिणीबरोबर बांगलादेशची सीमा बेकायदा ओलांडून आलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पुण्यात आपत्तीजनक प्रसंग ओढवला. या मुलीला मैत्रिणीनेच ५ लाख रुपयांना बुधवार पेठेतील एका कोठेवालीला विकले. त्यानंतर कोठेवालीने ‘तू बांगलादेशी असल्याचे पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करेन’ अशी धमकी देत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. ५ महिन्यांत झालेल्या अत्याचाराला वैतागून तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करत पोलिस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ५ महिलांवर गुन्हे दाखल झाले असून एका महिलेला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षे दोन महिन्यांची आहे. तिला बांगलादेशातून मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवत पुण्यात आणले. यासाठी त्यांना बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदा भारताची सीमा ओलांडली. पुण्यात आल्यावर त्या भोसरीमध्ये ७ ते ८ दिवस राहिली. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठेत आणले. तिथे तिला एका महिलेला ५ लाखांत विकले. त्यानंतर महिलेने तिला तुळशीबाग आणि बुधवार पेठेतील कोठ्यात ठेवले. तिला पोलिसांत देण्याची धमकी देत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. पीडितेला अत्याचार सहन होत नव्हते. मात्र, तिला खोलीतून बाहेर पडू दिले जात नव्हते. ५ महिने अत्याचार सहन केल्यावर तिने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला, पंरतु ७ एप्रिलला ती कशीबशी खोलीतून बाहेर पडली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशी नागरिकांची मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात अनेक बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याबाबतचे पुरावेही त्यांनी पुण्यातील प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. पुणे पोलिस शहरातील अनेक ठिकाणी सध्या सर्च आॅपरेशन राबवत आहेत. या माध्यमातून अनेक जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे कुठलेही भारताचे कुठलेही अधिकृत कागदपत्रे सापडली नसल्याचेही समोर आले आहे. बसने गाठले पाेलिस ठाणे तिने बस, रिक्षा पकडत हडपसर गाठले. तेथे हडपसर पोलिस ठाण्याची माहिती मिळताच तेथे धाव घेत तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल करत एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.