अंधेरी येथे फर्निचरचा व्यवसाय करणाऱ्यास त्याच्याच परिचयातील एका व्यक्तीने उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथील काही शाळांसाठी बाकाची गरज असल्याचे सांगितले. त्याबाबत निविदा काढल्या जाणार असून संजय हे लायझनिंग अधिकारी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने संजय सिंग याच्याशी संपर्क केला. व्यावसायिक आणि संजय यांच्यामध्ये अंधेरी येथे याबाबत चर्चा करण्यासाठी भेट झाली. संजयने तो शिक्षण विभागाचा उपसंचालक असल्याचे भासवले. संजयने निविदा हवी असल्यास तुम्हाला मदत करू असे सांगून बँक खात्याचा नंबर दिला. सुरुवातीला व्यावसायिकाने त्या खात्यात २ लाख ७० हजार रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर त्याने मुज्जफर नगर जिल्ह्यातील नोंदणीची पावती दिली आणि तुमच्या कारखान्याचे निरीक्षण करावे लागणार, असे त्यांना सांगितले. कारखान्याला भेट देणार असल्याने त्याने सहा लाख रुपये एका खात्यात जमा केले.
व्यवसायिकाने पैसे जमा केल्यावर दोन जण भिवंडी येथील कारखान्यात आले. बाकाचे नमुने तपासणीसाठी अधिकाऱ्यांना काही रक्कम द्यावी लागेल, असे त्यांना सांगितले. निविदा हवी असल्याने काही पैसे त्यांना दिले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्याने पैसे मागणे सुरूच ठेवले. पैसे दिल्यावर पर्चेस ऑर्डर आणि अॅडव्हान्स चेकसाठी व्यवसायिकाने संजयला विचारणा केली. संजय हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने एकाला लखनऊ येथील शिक्षण विभागातील कार्यालयात धाडले. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केली. निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या पथकाने संजयला उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्याने अशाप्रकारे अनेकांना फसविल्याचे समोर आले आहे.