विशाखापट्टणम : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. भारताचा हा मानहानीकारक पराभव होता. हा सामना संपल्यावर रोहित शर्माची एक मुलाखत घेतली आणि या सामन्यात मैदानात उतरण्यापूर्वी आम्हाला काय माहिती होतं, हे त्याने सांगितले आहे.
भारतीय संघाला दुसरा सामना जिंकून मलिका खिशात टाकण्याची नामी संधी होती. पण या सामन्यात तर भारताचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात भारताच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. भारताचे फलंदाज एकामागून एक धारातिर्थी पडायला लागले आणि त्यामुळे त्यांचा डाव गडगडला. विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक ३१ धावा केल्या आणि त्यामुळेच संघाला ११७ धावा तरी करता आल्या. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीत काही तरी कमाल दाखवेल, अशी भाबडी आशा चाहत्यांना होती. पण ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यामुळे भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्माने एक वक्तव्य केले आणि ते सध्याच्या घडीला चांगलेच चर्चेत आले आहे.
सामना संपल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, ” आम्ही जेव्हा गोलंदाजीसाठी मैदानात उतरत होतो, तेव्हा आम्हाला माहिती होते की धावसंख्या आम्हाला विजय मिळवून देणारी नाही.” त्यामुळे रोहित शर्माने तिथेच हार मानली होती. एखादा कर्णधार धावसंख्या जरी कमी असली असती तर तो विजयासाठी नाही पण १-२ विकेट्स मिळवण्यासाठी तरी प्रयत्नशील असला असता. पण रोहितच्या बाबतीत मात्र ही गोष्ट पाहायला मिळाली नाही. भारताचे आव्हान नक्कीच माफक होते, यात वाद नाही. पण एक कर्णधार म्हणून मैदानात उतरण्यापूर्वी हार मानणे योग्य नाही. रोहितने जर सुरुवातीला १-२ विकेट्स लवकर मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर हा सामना अधिक रंजक होऊ शकला असता. पहिल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली नव्हती. पण त्यांनी भारताची ३ बाद १६ अशी अवस्था केली होती, हे विसरून चालणार नाही.