लग्नाला जाण्याआधी नवरीच्या हातून लावले जाते झाड:सुलतानपूर ग्रामस्थांनी दहा वर्षांपासून जोपासली परंपरा, विवाह सोहळ्यातून दिला जातो पर्यावरण संवर्धनाचा संदेश
शहादा तालुक्यातील सुलतानपूर हे गाव साधारण तीन हजार वस्तीचे आहे. या गावाची अशी परंपरा आहे की, या गावातील लेक लग्न करण्यास जाण्याआधी गावात वृक्षारोपण लावते, मगच आपले वऱ्हाड येथून जाते. या ठिकाणी ही परंपरा मागील दहा वर्षांपासून सुरु असून, या गावाचा हा एक महत्वाचा संदेश असून पर्यावरणपूरक संस्कृती दर्शवते. लग्न झालेली मुलगी ही आपली आठवण या वृक्षाच्या स्वरूपात कायमस्वरूपी येथील स्थापित करून जाते. अश्या अनेक वृक्षांची लागवड या ठिकाणी झाली असून आज ती वृक्ष बहरली आहेत. विवाह सोहळा म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा आनंदाचा क्षण. हा सोहळा अविस्मरणीय व्हावा अशी प्रत्येक वधू – वराची ईच्छा असते. यात अनेक वधू – वर या लग्न सोहळ्यातून सामाजिक उपक्रम राबवताना दिसत असतात. असाच एक सामाजिक उपक्रम येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या कंचन पाटील हिचा विवाह समयी ही परंपरा कायम ठेवण्यात आली. मुलाकडे लग्न असल्याने कंचन हिने वऱ्हाड जाते वेळीस गावात वृक्षरोपाची लागवड केली. यावेळी युवराज पवार, राहुल शिंदे, गणेश पाटील, विनोद पाटील, दिनेश पाटील, विनोद मोरे व महिला वर्ग उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. लग्नासाठी जाण्याआधी गावात वृक्षारोपण करुन, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यातून दिला जातो. आपल्या लाडक्या मुलीची आठवण म्हणून नवरी मुलीच्या हस्ते एक झाड लावले जाते. या झाडाचे संगोपनही केले जाते. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वृक्षतोड, अपुऱ्या प्रमाणात वृक्षलागवड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल होत असून पावसाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या गोष्टीची दखल घेत, विवाह सोहळ्यात वृक्षारोपण केले.