म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बांधकाम व्यावसायिकांकडून सोसायट्यांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या असंख्य तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. पाणीपुरवठा न करून बिल्डर महापालिकेला लिहून दिलेल्या हमीपत्राचे थेट उल्लंघन करीत आहेत. याबाबत सोसायटी फेडरेशनने महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन बिल्डरकडून महापालिका आणि सदनिकाधारकांची कशी सुरू आहे, याची वस्तूस्थिती सांगितली. मात्र, यानंतरही महापालिकेकडून एकाही बिल्डरवर कारवाई करण्यात न आल्याने पालिका प्रशासन बिल्डरांवर कशामुळे मेहेरबान आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. अनेक उपनगरांमध्ये मोठमोठ्या सोसायट्या उभ्या राहत आहेत. मध्यवर्ती भागात राहणारे नागरिकही आता उपनगरांमध्ये राहण्यास पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे मोशी, चऱ्होली, डूडूळगाव, दिघी, पुनावळे, वाकड, सांगवी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. नागरिकांनी लाखो रुपये घेऊन या ठिकाणी घरे विकत घेतली. मात्र, अद्यापही नागरिकांना पाण्यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या भागांतील शेकडो सोसायट्यांना दररोज टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागत आहे.हमीपत्राताचे उल्लंघनशहरातील असंख्य सोसायट्यांना अद्यापही महापालिकेने योग्य पद्धतीने नळ जोडणी दिलेली नाही. यामुळे उपनगरांमध्ये बांधकाम करताना संबंधित बिल्डरकडून महापालिकेने हमीपत्र घेतले आहे. यामध्ये ‘महापालिकेकडे आंद्रा धरणाचे पाणी येईपर्यंत या सोसायट्यांना बिल्डरने स्वतः पाणीपुरवठा करावा,’ असे हमीपत्रात म्हटले आहे. मात्र, बिल्डरकडून या हमीपत्राचे उल्लंघन केले जात आहे. कोणताही बिल्डर सोसायटीला पाणीपुरवठा करीत नाही. प्रत्येक सोसायटीला पाणी विकतच घ्यावे लागत आहे.अधिकारी-बिल्डरांमध्ये साटेलोटे?बिल्डकडून पाणीपुरवठा होत नसल्याच्या असंख्य तक्रारी सोसायटी फेडरेशनकडून महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. याबाबत आयुक्तांसोबत बैठकाही घेतल्या आहेत. मात्र, महापालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे महापालिका अधिकारी आणि बिल्डरांमध्ये सोटेलोटे असल्याचा आरोप सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांनी केला आहे.टँकरच्या किमतींवरही नियंत्रण गरजेचेशहरातील उपनगरांमध्ये शेकडो सोसाट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बिल्डरकडून पाणीपुरवठा होत नसल्याने सोसायटीकडून दररोज विकतचे टँकर मागविले जातात. अनेक बिल्डरांचे टँकर व्यावसायिकांसोबत साटेलोटे असल्याने अनेकदा चढ्यादराने टँकर उपलब्ध केले जातात. यामुळे टँकरच्या किमतींवरदेखील नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम परवाना देताना व्यावसायिकांकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. त्यामुळे महापालिका पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करेपर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी सोसायट्यांना पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र, सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचा तक्रारी आल्या आहेत. याबाबत चौकशी करून नक्की परस्थिती काय आहे आणि त्यावर काय कारवाई करता येईल, याचा विचारविनीमय सुरू आहे.- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकागेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. शेकडो सोसायट्यांचे पाण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. महापालिका अधिकारी, पदाधिकारी, राजकारणी अशा सर्वांकडे विनंती करून झाली आहे. मात्र, अद्यापही सोसायट्यांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि बिल्डर यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा आमचा आरोप आहे.- संजिवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन