नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घेतल्याच्या चर्चा असताना तसेच आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युतीची शक्यता वर्तवली जात असताना संभाव्य युतीत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण आज मनसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित राज ठाकरे यांनी प्रस्तापितांशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये जाऊन आगामी काळात त्यांच्याविरोधात दोन हात करण्याचा मानस राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवला. नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल, असं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याआधीच फिस्कटली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

विदर्भात पक्षाचं अस्तित्व वाढविण्यासाठी आणि पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे सुमारे तीन वर्षांनंतर नागपूरला पोहोचले आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसने निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. मनसे कार्यकर्त्यांनी थाटामाटात राज ठाकरे यांचं स्वागत केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरेंना गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडावं लागलं. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम आवरुन राज ठाकरे यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रवी भवन सर्किट हाऊसवर संघटनात्मक बैठक घेतली. याच बैठकीत मार्गदर्शन करताना राज यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये जान भरली.

राज ठाकरे म्हणाले, आपल्याजवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे. कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, अशा सूचना त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहे, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरात पोहोचा. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल”

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आगामी काळात विदर्भात पक्षांतर्गत बदल होतील. खांदेपालटही होईल. बदलांना तयार राहा. तुमच्यावर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी आहे. पण एक निश्चित आहे की नागपूरमध्ये पक्ष वाढवायचा असेल, पक्षाला बळकटी द्यायची असेल तर प्रस्थापितांशी लढावं लागेल”, असं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलं.

कसा असेल राज ठाकरेंचा विदर्भ दौरा

  • राज ठाकरे पक्ष बांधणीसाठी आजपासून 5 दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर
  • आज राज ठाकरेंची सकाळी ११ वाजता रवी भवन सर्किट हाऊसवर संघटनात्मक बैठक
  • उद्या १९ सप्टेंबर- मनसे नेत्यांच्या गाठीभेटी, राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे.
  • त्यानंतर दुपारी 2 वाजता ते चंद्रपूरला रवाना
  • चंद्रपुरात विभागवार बैठका होतील
  • २० आणि २१ सप्टेंबर- अमरावतीत विभागवार बैठका
  • २२ सप्टेंबर- राज ठाकरे मुंबईत परतणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.