भाजपला पाशवी बहुमत मात्र, आता तंगड्यात तंगडे:पडद्यामागे एकमेकांच्या छातीवर बसण्याचे कार्यक्रम; संजय राऊत यांची लवकर सरकार स्थापन करण्याची मागणी

भाजपला पाशवी बहुमत मात्र, आता तंगड्यात तंगडे:पडद्यामागे एकमेकांच्या छातीवर बसण्याचे कार्यक्रम; संजय राऊत यांची लवकर सरकार स्थापन करण्याची मागणी

देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तिन्ही पक्षाचे तंगड्यात तंगडे अडकले आहे. एकमेकांच्या छातीवर बसण्याचे कार्यक्रम पडद्यामागे सुरू आहेत. मग तुम्हाला लोकांनी बहुमत कशासाठी दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या शूरवीर नेतृत्त्वाने डोळे वाटारले तरी सर्व शांत बसत होते, असेच चित्र होते. मात्र आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना घाबरणे बंद झाल्याचे दिसून येत आहे. इतकंच नाही तर आव्हानाची भाषा वापरून मोदी आणि शहा यांनाच आव्हान दिले जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला लवकरच एक सरकार मिळेल, मुख्यमंत्री मिळेल आणि कारभार सुरु होईल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका ही’ गरज सरो वैद्य मरो’ अशी आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर त्याचा काही उपयोग नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने फिरवलेल्या शब्दाचे सर्वात मोठे पीडित ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. भाजप दिलेला शब्द कधीही पाळत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तेवढी नैतिकता भारतीय जनता पक्ष कधीही पाळत आलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा आश्वासनाची बरसात करतात. मात्र त्यांचे काम झाल्या नंतर ते लाथा घालतात. हे सध्या महाराष्ट्रात दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपला मिळालेले बहुमत पाशवी भारतीय जनता पक्षाला मिळालेले असे पाशवी बहुमत आहे. अशा प्रकारचे पाशवी बहुमत देशाला आणि लोकशाहीला हाणीकारक असते. अशावेळी भ्रष्टाचार वाढतो, लोकशाहीचा खून होतो, अदानी सारखी भूते निर्माण होतात असे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. भारतीय जनता पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राला लवकरात लवकर सरकार मिळायला हवे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी त्या पैशांची वाट पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे आता सरकारचे शेतकरी वाट बघत असल्याचेही राऊत म्हणाले. त्यामुळे त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शिंदेंना पंतप्रधान पदाचीही ऑफर असेल एकनाथ शिंदे यांना भाजपाने केंद्रात गृहमंत्री पदाची ऑफर दिली असेल किंवा भविष्यात पंतप्रधान करतो असे म्हटले असेल. मात्र ज्या पक्षाकडे 140 हा बहुमताचा आकडा आहे. त्यांचाच मुख्यमंत्री होतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, या विषयी माझ्या मनात शंका नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रचूड यांच्यावर पलटवार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावावी अशी आमची अपेक्षा नव्हतीच. मात्र त्यांनी निकाल द्यावा, अशी आमची मागणी होती. जो काही निकाल असेल तो जाहीर करावा, अशी आमची मागणी होती. यासंदर्भात घटनेचे, कायद्याचे, संविधानाचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. याची आम्ही अपेक्षा केली असेल तर त्यात आमचे चुकले काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. यात विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी याचा संबंध नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून संजय राऊत यांनी चंद्रचूड यांनी दिलेल्या उत्तरावर पलटवार केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment