भाजपचे मिशन ‘खेड्याकडे चला’:मंत्र्यांना महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्कामी राहावे लागणार, चंद्रशखेर बावनकुळेंच्या सूचना
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजप स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आज शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून मिशन ‘खेड्याकडे चला’ सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री, पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. या मिशननुसार सर्व मंत्र्यांनी एक दिवस खेड्यात मुक्काम करावा, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिल्याची माहिती आहे. शिर्डीत होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना मार्दर्शन केले. भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करावा, अशा सूचना चंद्रशखेर बावनकुळे यांनी या बैठकीत दिल्या आहेत. काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घेण्यासाठी पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल, असे बावनकुळे म्हणाले. खेड्यात जाऊन तेथे मुक्काम करावा लागेल, लोकांशी संवाद साधावा लागेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात एक ओएसडी असा असेल, की जो फक्त पक्ष संघटनेशी संबंधित कामांकडे आवर्जून लक्ष देईल, असे बावनकुळे म्हणाले. चंद्रशखेर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आता भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा खेड्यात मुक्कामी राहावे लागणार आहे. यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडे असणारी कामे मार्गी लागण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. आगामी निवडणुका बावनकुळेंच्याच अध्यक्षतेखाली
राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर प्रदेशाध्यक्ष पदाची निवड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. भाजपच्याच ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे हे महसूलमंत्री राहतील, तर रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.