शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा काठावर पराभव:अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे राम शिंदे यांचा 352 मताने विजय
अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व उमेदवार रोहित पवार यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कर्जत जमखेड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे प्राध्यापक राम शिंदे यांचा केवळ 352 मतांनी विजय झाला आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे पराभूत झाले आहेत. थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदान मानले जात होते. तसेच सध्या राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, स्वत:चा मतदार संघ राखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. काका विरुद्ध पुतण्या अशा या लढतीमध्ये अखेर काका अजित पवार यांचा विजय झाला असून पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला असल्याचे स्पष्ट होत आहे.