वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ आणि ‘नरगिस दत्त राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारांमधील अनुक्रमे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरगिस दत्त यांची नावे वगळण्यात आली आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने सुचविल्यानुसार ‘७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ नियमावली’मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, दादासाहेब फाळके पुरस्कारासह अन्य पुरस्कारांच्या रोख रकमांतही वाढ करण्यात आली आहे.

आता ‘इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ या पुरस्काराचे नाव ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे करण्यात आले आहे. तसेच, या पुरस्काराचे रोख पारितोषिक याआधी चित्रपटनिर्माता आणि दिग्दर्शकाला विभागून दिले जायचे. नव्या बदलानुसार, ते आता केवळ दिग्दर्शकालाच मिळेल. तर, ‘नरगिस दत्त सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता चित्रपटा’चे नाव ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असे बदलण्यात आले आहे. या श्रेणीत सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनावरील चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे. तर, भारतीय चित्रपटांमधील अतुलनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रोख पारितोषिकाची रक्कम १० लाखांवरून १५ लाख करण्यात आली आहे.

सुवर्ण कमळ पारितोषिकाच्या रकमेत तीन लाखांची तर, सर्व श्रेणींत रौप्य कमळ जिंकणाऱ्या पारितोषिकांच्या किमतीत दोन लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ‘सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक’ या पुरस्काराचे नाव ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ असे करण्यात आले आहे. ‘विशेष ज्युरी पुरस्कार’ रद्द करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या चित्रपट आणि बिगर चित्रपट श्रेणीमध्ये दोन विशेष उल्लेखनीय चित्रपट पुरस्कार देण्याचा अधिकार ज्युरींना असेल.

‘निर्णय सर्वानुमते’
‘समितीने करोनासाथीच्या काळात झालेल्या बदलांवर चर्चा केली. त्यानंतर हे बदल करण्याचा निर्णय शेवटी सर्वानुमते घेण्यात आला,’ असे एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या समितीचे सदस्य असणारे चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी डिसेंबरमध्येच त्यांच्या शिफारसी सुचवल्या होत्या. ‘मी ध्वनीसारख्या तांत्रिक विभागात काही बदल सुचवले होते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

सन २०२२च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० जानेवारी रोजीच संपली आहे. करोनासाथीमुळे राष्ट्रीय पुरस्कारांना यंदा उशीर झाला आहे. सन २०२१चे राष्ट्रीय पुरस्कार गेल्या वर्षी प्रदान करण्यात आले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *